निंबळकमध्ये जुनी भांडी, साहित्य प्रदर्शन

फलटण,  (प्रतिनिधी) – प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांची योग्य दिशेने तयारी करुन घेवून शासनाने निश्‍चित केलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच या विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, त्यामधील स्थित्यंतरे याची माहिती देवून एका अर्थाने प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेवून खऱ्या अर्थाने सक्षम आणि कर्तृत्ववान माणूस घडविण्याची किमया शिक्षक करु शकतो, याचा प्रत्यय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबळक (ता. फलटण) येथे भरविण्यात आलेल्या कौटुंबिक स्तरावरील जुनी भांडी व अन्य साहित्याच्या प्रदर्शनातून आला आहे.
निंबळक येथील प्राथमिक शाळेचे उपशिक्षक रवींद्र जंगम यांनी आपल्या सेवा काळात त्या त्या शाळेत अशा प्रकारचे विविध उपक्रम आपले सहकारी व ग्रामस्थांच्या माध्यमातून राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच अन्य शिक्षण देवून खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे. निंबळक शाळेतही त्यांनी जुनी भांडी व अन्य कौटुंबिक उपकरणांचे प्रदर्शन भरवुन ग्रामस्थांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना अनोखे शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
या प्रदर्शनात माती, दगड, लाकूड, लोखंड, तांबे, पितळ, कांस्य, चांदी, ऍल्युमिनीयम, हिंदालीयम, स्टेनलेस स्टील, कांच, प्लॅस्टिक अशा विविध प्रकारातील सुमारे 700 हून अधिक प्रकारची भांडी मांडण्यात आली होती त्यामध्ये जुन्या काळातील वेगळ्या धाटणीचे पाटे, वरवंटे, दगडी जाते, उखळ, मुसळ, पीकदाणी, पानपुडे, ेशेवयाचे साचे, फिरकीचा तांब्या, जुनी तांब्या पितळेची भांडी, घंगाळी, तरसाळी, कासंडी, ओघराळे, जुन्यातल्या खिसण्या, सांडशी, पळी, कटोरा, त्याकाळी धान्य व अन्य वस्तूंच्या मोजमापासाठी वापरण्यात येत असलेली आधुली, चिपटे, मापटे, कोळवे, विविध प्रकारची तांब्या, पितळेची भांडी, सौरचुल त्याचबरोबर अलीकडील ब्लेंडर, मिक्‍सर, फूड प्रोसेसर, इंडक्‍शन कुकटॉप अशा भांड्यांबद्दल विद्यार्थ्यांना असलेले कुतुहल योग्य माहिती देवून जागृत ठेवण्यात रविंद्र जंगम यशस्वी झाल्याचे दिसून आले.

जुन्या परंपरांचा मागोवा….
या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली भांडी आणि कौटुंबिक वापरातील जुन्या वस्तू ह्या केवळ वस्तू नसून त्यातून पुरातन संस्कृती, जुन्या पिढीतील लोकांच्या वापराची पध्दती, त्यांची कौटुंबिक व्यवस्था, नजरेसमोर येत असल्याने त्यातून प्रत्येकाला आपल्या पूर्वजांच्या, सग्या सोयऱ्यांच्या आठवणी जाग्या झाल्याचे जाणवत असतानाच पूर्वीच्या काळी एक प्रकारे या उपकरणातून त्या महिलेचा व्यायामच घडत असल्याचे दिसून येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)