नाल्यांची कामे नागरिकांच्या जिवावर

भिंत पडण्याच्या दोन घटना : गर्भवती महिलेची सुटका, परंतु चिमुकल्यांने जीव गमावला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या नाल्याचीं कामे शनिवार नागरिकांच्या जिवावर बेतली. या कामांमुळे दोन ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. वायसीएम रुग्णालयामागे भिंत दरवाज्यावरच कोसळल्याने एक गर्भवती महिला घरात अडकून राहिली होती. तिला कसेबसे बाहेर काढण्यात आले होते. परंतु कासारवाडी येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत मात्र अग्निशामक दलाने चार तास शर्थीचे प्रयत्न करुन बाहेर काढलेल्या एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. लोकेश ठाकूर असे या मुलाचे नाव आहे.

कासारवाडी येथील शास्त्रीनगरमध्ये ड्रेनेजचे काम करताना ठेकेदाराने ब्रेकरचा वापर केला. ब्रेकर वापरण्यापूर्वी जवळपास कुणी नाही ना ? हे पाहण्याची तस्दी ही घेण्यात आली नाही. ब्रेकर लावल्यामुळे यशवंत प्राईड सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली. येथे काही मुले खेळत होती. बाकीची पळाली, परंतु एका चिमुकल्याला मात्र पळण्याची संधीही मिळाली नाही आणि तो ढिगाऱ्याखाली चिरडला गेला. तब्बल चार तास दोन जेसीबीच्या सहाय्याने राडा-रोडा काढल्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात यश आले. मुलाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या अनेक भागात नाल्याची कामे सुरु आहेत. मात्र, नाल्याचे काम करताना ठेकेदाराकडून जवळच्या घराबाबात आवश्‍यक ती काळजी घेतली जात नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. आजच असा प्रकार घडल्याने एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

कासारवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातही काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेले ड्रेनेजचे काम पुन्हा सुरू करण्यात आले होते. हे काम करण्यासाठी ठेकेदाराच्या वतीने ब्रेकरचा वापर करण्यात आला. यामुळे शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास येथील यशवंत प्राईड इमारतीची भिंत कोसळली. यावेळी लहान मुले येथे खेळत होती, त्यापैकी काही मुले पळाली परंतु काही कामगार व एक चिमुकला या ढिगाऱ्यात अडकले. कामगार तर निघाले, परंतु चिमुकला अडकून राहिला. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या इमारतीकडे जाण्यासाठी वाट अरुंद असल्याने बचाव कार्यात अग्निशामक दलालाही मोठ्या अडचणीला सामोरे जावे लगत होते. सुरवातीला, अग्निशामक विभागाच्या जवानांनी कामागारांना बाहेर काढले. मात्र, भरावामध्ये पाच वर्षीय चिमुकल्याला बाहेर काढणे कठीण असल्याने जेसीबी मशीन मागवून त्याद्वारे भराव उपसण्यात आला. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर या चिमुकल्याला बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र, चार तास भरावाखाली राहिल्याने चिमुकल्याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.