मोदी सरकारच्या “त्या’ निर्णयाचे दुख:
नवी दिल्ली – केंद्र सरकारने 12 जून 2019 ला जारी केलेल्या पत्रकामध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांना आणि इंजिनियर्सला 1996 पासून देण्यात येणारे दोन अतिरिक्त भत्ते बंद करण्याचे आदेश इस्रोला दिले होते. त्यामुळे इस्रोमधील स्पेस इंजिनियर्स असोसिएशनने (एसईए) इस्रोच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात हा भत्ता बंद केल्यास वैज्ञानिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल अशी शक्यता व्यक्त करत हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे.
इस्रोच्या वैज्ञानिकांकडे पगार वगळता उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नाही. त्यामुळेच केंद्राने वैज्ञानिकांचे तसेच इंजिनियर्सचे पगार कमी करण्यासंदर्भात काढलेला आदेश रद्द करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी अशी मागणी एसईएने इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांच्याकडे पत्रामधून केली आहे. एसईएचे अध्यक्ष ए. मणिरमन् यांनी सिवन यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पगाराचा भाग असणारा प्रोत्साहन भत्ता कमी केल्यास वैज्ञानिकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असे म्हटले आहे. तसेच हा भत्ता रद्द केल्यास वैज्ञानिकांचा उत्साहही कमी होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर इस्रोमधील सर्वच वैज्ञानिकांना आश्चर्य वाटले असून या निर्णयामुळे आम्ही दु:खी आहोत, असे मणिरमन् या पत्रात म्हणाले आहेत.
असा होता सरकारचा आदेश
1 जुलै 2019 पासून इस्रोच्या वैज्ञानिकांना देण्यात येणारा भत्ता बंद करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे डी, ई, एफ आणि जी श्रेणीतील वैज्ञानिकांना देण्यात येणारा हा प्रोत्साहन भत्ता मिळणे बंद होणार आहे. इस्रोमध्ये जवळजवळ 16 हजार वैज्ञानिक आणि इंजिनियर्स काम करतात. मात्र, सरकारच्या या आदेशामुळे इस्रोमधील 85 ते 90 टक्के वैज्ञानिक आणि इंजिनियर्सचा पगार 8 ते 10 हजारांनी कमी होणार आहे. इस्रोमधील बहुतांश वैज्ञानिक आणि इंजिनियर्स या निर्णयाचा फटका ज्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बसणार आहे त्याच श्रेणीतील आहेत. म्हणूनच इस्रोमधील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.