‘ना’राजकारण दूर करत ठरलंय तेच करायचं!

शिरूर मतदारसंघात पराभवातून शिवसेना घेतेय धडा

पाबळ – ‘सत्तेत’ स्थिर रहायचे असेल तर “राजकारणाला थारा न देता’ समाजकारण वाढवायचे असते, त्यामुळे सर्वसामान्यांची नाडी तर कळतेच शिवाय सत्ता असताना घडलेल्या चुका आणि निर्माण झालेल्या उणिवा सुधारण्याची संधी मिळत असते, त्यातून ‘नाराज’कारण दूर करत सत्तेची स्थिरता टप्प्यात आणता येत असते.

गाफीलतेमुळे याच चक्राला फिरवता न आल्याने झालेल्या पराभवाचे खापर कोणावरही न फोडता, पुन्हा कामाला लागायचे असते, कदाचित हाच धडा घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पुन्हा कामाला लागल्याचे दिसून येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उपनेतेपदी निवड केली आणि आढळराव यांनी यांनी एकाचवेळी अनेक पातळ्यांवर वेगाने काम सुरू केले आहे, यामागे नुसतीच आंबेगाव विधानसभा डोळ्यासमोर असेल या अंदाजाला धक्का देणारा आदेश मातोश्रीवरून दिला गेला असल्याची चर्चा सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपची मनमोकळी साथ मिळाली. त्यामुळे युतीही फिट होऊन मोठे यश मिळाले; मात्र सतत तीन लोकसभा वाढत्या मताधिक्‍याने जिंकून शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला बालेकिल्ला करून भेट देणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव जिव्हारी लागल्यानेच त्यांना पक्षाच्या मुख्य पदाची रसद देत मातोश्रीने मोठ्या कामगिरीसाठी नियुक्त केले असल्याची चर्चा आहे. तर तोच आदेश शिरसावंध्य मानत माजी खासदारांनीही कडेकोट तयारीत पावले टाकायला सुरुवात केली असल्याचे दिसून येते. सध्या खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. यासाठी कलमोडी, धामणी या गावांचा पाणीप्रश्‍न, तरुणांना रोजगार देण्यासाठी मेळावे, रेल्वे प्रश्‍न, विमानतळ याबरोबर कार्यकर्त्यांची झाडाझडती, सर्वसामान्यांबरोबर जलद संपर्क व निर्णायक भूमिका घेण्याचे अभियान सुरू केल्याचे दिसून येत असून भाजपच्या मदतीने संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ युतीच्या अखत्यारीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. हे करताना ‘आमचं काही ठरलंय’, हाही संदेश देण्याचे काम सुरू केले आहे. हेच दिसून येत आहे.

कुंपणावर असणाऱ्यांना धडा…
सत्तेच्या सारीपाटात जवळचा कार्यकर्ता महत्वाचा असतो, तो सरळ चालला तर मोठा समाज जवळ राहात असतो, यामध्ये तळागाळातील ताकद देऊन पदाधिकारी झालेले कार्यकर्ते महत्वाचे ठरत असताना, काही पदाधिकारी सत्तेचा वापर करून इतरांना टार्गेट करत वेठीस धरतात. त्यांच्या मनमानीची किंमत सर्वसामान्य मतदार नेत्यांना मोजायला लावत असतो. “आशां’ना मातोश्रीच्या मदतीने व स्वयंनिर्णयाने धाडसाने बाजूला करायची हिम्मत दाखवली तर कुंपणावरचे मतदार आत उडी घेतात, हा अनुभव राजकारणातून येतच असतो, याची दखल घेतली तर गेलेले परत मिळू शकते, याचाही अंदाज माजी खासदार आढळराव यांना असावा.

Leave A Reply

Your email address will not be published.