नागरी सहकारी बँकेत भरतीसाठी आता ऑनलाईन परीक्षा

-दबावाखाली प्रकिया राबविल्यास फौजदारी कारवाई
-गुणवत्तापूर्ण सेवक अन्‌ ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय

सम्राट गायकवाड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा – नागरी सहकारी बॅंकांमध्ये भरतीप्रकियेसाठी आता ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदोष भरतीमुळे बॅंकांच्या प्रशासनावर परिणाम होवून ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहचू नये तसेच बॅंकींग व्यवसायाचा आत्मा असलेला सेवक गुणवत्तापुर्ण असावा, हा उद्देश समोर ठेवून राज्य सहकार विभागाने निर्णय घेतला आहे.

भरतीसाठी यापूर्वी होणाऱ्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत होती. मात्र, या प्रक्रियेत परीक्षा व परीक्षोत्तर टप्प्यात काही बॅंकांच्या बाबतीत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. चौकशीअखेर भरती प्रक्रिया प्रामाणिक, निष्पक्ष व पारदर्शक पध्दतीने झाली नसल्याची निदर्शनास आल्यामुळे शासनाने आता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आता बॅकांनी भरती प्रकिया राबविण्यासाठी केंद्रशासनाचे उपक्रम असलेले इंडियन बॅंकींग पर्सनल सिलेक्‍शन बोर्ड, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ( पुणे) व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग ऍण्ड फायनान्स (मुंबई), धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान (नागपूर) अथवा बॅंकिंग भरती परीक्षा घेणाऱ्या केंद्रशासनाचे अंगीकृत उपक्रम असलेल्या तत्सम संस्थांद्वारे भरती प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, निवड केलेल्या संस्थांमध्ये बॅंकेचे संचालक अथवा अधिकारी कर्मचारी व त्यांचे नातेवाईकांचे हितसंबध असता कामा नये, याची दक्षता घेण्याची सूचना शासनाने केली आहे.

नियुक्त केलेल्या संस्थेला राष्ट्रीयकृत, नागरी सहकारी, शेड्युल्ड बॅंक आणि शासनाच्या बॅंकांच्या विविध विभागांमध्ये नोकर भरतीची ऑनलाईन प्रकिया राबविलेली असावी. तसेच संस्थेची निवड करताना परीक्षा राबविण्याची पध्दत व मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या संस्थेचा प्राधान्याने विचार करण्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे संबधित संस्थेविरूध्द नोकरभरतीच्या अनुषंगाने तक्रारींमध्ये दोषी असल्याचे सिध्द झालेले नसावे आणि संस्थेला काळ्या यादीत समावेश केलेले नसावे.

संस्थेची निवड ही संचालक मंडळाच्या मान्यतेने करण्यात यावी आणि त्यानंतर संस्थेच्या कामाबाबत वाद व तक्रारी उद्‌भवल्यास कार्यवाही ही बॅंकेनेच करायची आहे. भरती करताना संस्थेने स्वत: अथवा बॅंकेच्या दबावाखाली येवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यास चौकशी करून भरती प्रक्रिया रद्द अथवा स्थगिती आणि फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याची जबाबदारी बॅंकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर असणार आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया बॅंकाना लागू असलेल्या आरक्षणानुसार पार पाडण्यात येणार आहे. मुलाखत व नियुक्तीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबधित संस्थेस देणे आवश्‍यक असणार आहे.

…तर पॅनेलवरील व्यक्तीला सहभागी होता येणार नाही

संपूर्ण भरती प्रकिया ही नियुक्त संस्थेला करावी लागणार आहे. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेची जाहिरात प्रसिध्दी, ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारणे, अर्जदार उमेदवारांची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा होणार आहे. त्याच बरोबर प्रश्‍न पत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी ठेवणे व परीक्षा संपल्यानंतर तीन तासांच्या आत उत्तर तालिका प्रसिध्द करणे आणि उत्तरांबाबत आलेले आक्षेप तीन दिवसाच्या आत मागवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्त आक्षेपांवर परीक्षा संपल्यापासून पाच दिवसांच्या आत सुधारित व अंतिम उत्तर तालिका प्रसिध्द करावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत घेण्यासाठी आवश्‍यक व अनावश्‍यक पदांसाठी कार्यवाही करावी लागणार आहे. शंभरपैकी दहा गुण हे मुलाखतीसाठी असणार आहेत. त्यापैकी 5 गुण उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व उर्वरित 5 गुण हे मौखिक मुलाखतीसाठी असतील. मुलाखत घेण्यासाठी पॅनेल हे बॅंकेचे असणार आहे. मात्र, पॅनेलवरील व्यक्तीच्या नात्यातील उमेदवाराच्या मुलाखतीवेळी संबधित व्यक्तीला प्रकियेत सहभागी होता येणार नाही, ही बाब शासनाने विचारपुर्वक आदेशात नमूद केली आहे.

बॅंकांकडून निर्णयाचे स्वागत

शासनाने घेतलेल्या निर्णयाचा बॅंकेच्या संचालकांनी स्वागत केले आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेतल्यामुळे साहजिकच गुणवत्ता असलेल्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी संचालकांच्या नातेवाईकांची भरती केली जात होती. तो पायंडा आता नवीन निर्णयामुळे दूर होणार आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे बॅंकींग ग्राहकांना उत्तम सेवा देखील मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया वाई अर्बन बॅंकेचे चेअरमन सी. व्ही. काळे यांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)