नागरिकांना खरंच बाकड्यांची गरज आहे का?

मुख्यसभेत आयुक्तांनी उपस्थित केला प्रश्‍न : तपासणी अंती होणार खरेदी

पुणे – नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून बेंचेस खरेदी करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, नागरिकांना खरंच बाकड्यांची गरज आहे का, हे तपासून पाहाणे गरजेचे असल्याचे मत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले. तसेच, ही खरेदी केंद्र शासनाच्या गर्व्हमेन्ट ई-मार्केट प्लेसवरून केली जाणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारच्या मुख्यसभेत सुमारे दीडशेहून अधिक वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यात जवळपास 30 ते 40 प्रस्ताव ज्यूट बॅग तसेच बाकडे खरेदी करण्याचे होते. त्यास मान्यता दिली जात असतानाच, मनसे गटनेते वसंत मोरे यांनी माजी महापालिका आयुक्तांनी ज्यूट बॅग खरेदीस बंदी घातली असून कनिष्ठ अभियंते बाकडे खरेदीस मान्यता नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ही वर्गीकरने मान्य झाल्यास खरेदी होणार का, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मुख्यसभेत एकच गोंधळ उडाला. नगर सेवकांनी अशा प्रकारे बंदी कशी घातली, मुख्यसभेत त्याची माहिती का देण्यात आली नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. त्यावरून सभागृहात आणखीनच गोंधळ वाढला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी या प्रकरणी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदस्याचे समाधान झाले नाही. त्यामुळे आयुक्त राव यांनी या बाबत खुलासा केला.

केंद्राच्या ‘जेम’ पोर्टलवरून खरेदी
बाकडे खरेदीस कोणतीही बंदी नाही. मात्र, महापालिकेकडून विकासकामांसाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार, डिएसआर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरानुसार निश्‍चित केला जाणार आहे. त्यामुळे बाकडाचे डीएसआर केलेले नाहीत. त्यामुळे ही खरेदी केंद्राच्या “जेम’ पोर्टलवरून केली जाणार आहे. मात्र, ही खरेदी करताना, बाकडे कशी असावीत, त्याची गुणवत्ता निश्‍चित करण्यासाठी धोरण करून त्याची माहिती सभागृहास दिली जाईल, असेही राव यांनी सांगितले. तर, ज्यूट बॅग बाबत आयुक्तांनी आदेश काढलेले असले तरी, प्लॅस्टिक बंदीनंतर नागरिकांना पर्याय देणे आवश्‍यक असून प्रशासनाने पूर्वी प्रमाणे तीन लाखांपर्यंत खरेदी करावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले आहेत, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)