नागरवस्ती विभागावर “वॉच’

नगरसेवकांचा संताप: “एसएमएस’ सुविधेवरुन नाराजी

पिंपरी – महापालिका हद्दीतील नागरिकांना विविध योजनांचा लाभ व्हावा. यासाठी प्रशासनाने नागरवस्ती विभाग सुरू केला आहे. अपात्र लाभार्थींना “एसएमएस’ पाठवला जात नाही. तसेच, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेचाही सावळा गोंधळ आहे, असा अरोप नगरसेवकांनी केला. यावरुन महापालिका स्थायी समिती सभेत संबंधित विभागाच्या कारभारावर रोष व्यक्‍त करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरवस्ती विकास योजना विभागांतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना महापालिकेतर्फे “एसएमएस’ पाठविला जातो. अपात्र ठरलेल्या अर्जदारांना याबाबतच्या माहितीचा “एसएमएस’ पाठविला जात नाही. यावरून नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्यावर संताप व्यक्त केला. मात्र, झगडे या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी खडेबोल सुनावले.

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडून विहीत कागदपत्रांसोबत अर्ज भरून घेतला जातो. अर्जांची छाणनी झाल्यानंतर योजनेसाठी पात्र ठरलेल्या अर्जदाराला “एसएमएस’द्वारे माहिती कळविली जाते. अपात्र ठरलेल्या अर्जदाराला मात्र, तो अपात्र ठरत असल्याची माहिती एसएमएसद्वारे कळविली जात नाही. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नागरवस्ती विभागाबाबत नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांपर्यंत गेल्या आहेत. बुधवारच्या स्थायी समिती सभेत झगडे यांच्यावर संताप व्यक्त होणार असल्याची माहिती त्यांना मंगळवारी सायंकाळीच कळाली. आपल्याला स्थायी सभेत नगरसेवकांचे बोलणे सहन करावे लागणार असल्याचे समजताच झगडे यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या वरिष्ठांना आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगितले. त्यामुळे झगडे स्थायी समिती सभेत उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यावर नगरसेवकांनी झगडे यांच्यावरचा राग उपस्थित अन्य अधिकाऱ्यांवर काढला.

“नागरवस्ती’चा कारभार रामभरोसे
महिला व बालकल्याण योजनेंतर्गत महिलांना मोटार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी आठ हजार अर्ज आले आहेत. त्यातील 1700 अर्ज मंजूर केले आहेत. या पात्र अर्जदारांना नागरवस्ती विभागाने “एसएमएस’द्वारे योजनेस पात्र ठरल्याची माहिती कळविली आहे. मात्र, अपात्र अर्जदारांना त्याबाबत कल्पना व्हावी, यासाठी साधा “एसएमएस’ सुद्धा पाठविला नाही. इयत्ता दहावी, बारावी विद्यार्थी बक्षीस योजनेचाही असाच गोंधळ घातला आहे. शिलाई मशिन वाटप योजनेसाठी आलेल्या अर्जांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे नागरवस्तीचा कारभार रामभरोसे चालत आहे. अशा शब्दांत नगरसेवकांनी स्थायीच्या बैठकीत नागरवस्ती विभागावर संताप व्यक्त केला.

नागरवस्ती विभागात दहा कर्मचाऱ्यांची भरती
विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा भार नागरवस्ती विकास योजना विभागाला सध्या पेलत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कारण, या विभागात मनुष्यबळाचा अभाव असून, आलेले हजारो अर्ज ठेवण्यासाठी पुरेसी जागासुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे अर्जांमध्येही घोळ होण्याची शक्‍यता आहे. गतीमान कामकाजासाठी जास्तीचे कर्मचारी देण्याची मागणी सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. त्यावर कल्याणकारी योजनेचे कामकाज पाहण्यासाठी दहा कर्मचारी देण्याचा निर्णय आयुक्त हर्डीकर यांनी घेतला आहे. लवकरच ते दहा कर्मचारी या विभागाला दिले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)