पुणे – नांदेड सिटीपाठोपाठ वारजेतही बिबट्याची चर्चा

वन अधिकाऱ्यांकडून पाहणी : नागरिकांत भीतीचे वातावरण

वारजे – सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याची चर्चा जोरात असताना वारजे परिसरातदेखील बिबट्या दिसल्याची चर्चा गुरूवारी दिवसभर होती. दरम्यान, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडूनही या संदर्भात खातरजमा केली जात आहे.

वारजे-माळवाडी गणपती माथा परिसरात व कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील डुक्करखिंडीत बिबट्या दिसल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर परिसरात होती. काही नागरिकांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. डुक्करखिंडीजवळील वंडरफंकी येथे बिबट्या दिसल्याची बातमी गुरूवारी सकाळी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काही वेळातच वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली. या ठिकाणीदेखील वारजे माळवाडीचे पोलीस अधिकारी कर्मचारी पोहचले. वन विभागालादेखील ही माहिती मिळाल्यानंतर सहायक वनसंरक्षक महेश भावसार, हवेलीचे वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, महापालिकेच्या कात्रज प्राणी संग्रहालयातील प्रमुख अनिल खैरे आणि त्यांचे पथक बिबट्या दिसलेल्या दोन्ही संभाव्य ठिकाणी पोहचले त्यांनी या दोन्ही ठिकाणाची पाहणी केली. “या दोन्ही ठिकाणी बिबट्या च्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. प्रत्यक्ष बिबट्या पाहिला असे सांगणारी व्यक्ती आम्हाला भेटली नाही,’ असे भावसार यांनी सांगितले.

दरम्यान, सायंकाळपर्यंत केवळ अफवा होती, का खरेच कोणाला बिबट्या दिसला? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. सोशल मीडियावर बिबट्याचे जुने व्हिडिओ “व्हायरल’ होत असल्याने चर्चांना उधाण आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)