मंचर – नांदूर (ता. आंबेगाव) येथे वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात एक वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या रविवारी जेरबंद झाला आहे. परिसरात आणखी एका बिबट्याचे वास्तव्य असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागील आठ दिवसांपूर्वी बिबट्याने दिवसा हल्ला करून प्रकाश भोर यांच्या शेळीला जखमी केले होते. सरपंच शेखर चिखले आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अंकित जाधव यांनी वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. घोडेगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी नारायण आरुडे, कैलास दाभाडे, विजय वेलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जेरबंद केलेल्या बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह अभयारण्यामध्ये सोडण्यात आले असल्याचे सांगितले.