नव्या जिल्हाधिकाऱ्यांमुळे नगरकरांच्या आशा पल्लवीत

रंगभवन, नाट्यगृह, मास्टर प्लॅन, पिंपळगाव माळवी, फेज टू, अंतर्गत रस्ते, भुयारी गटार, अग्निशमनाचे आधुनिकीकरण
नगर – प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सीना सफाईचे काम धाडसाने हाती घेतले आणि सामान्य नगरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या. आता शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो असा आशावाद येथील भाबड्या मतदार व करदात्यांना वाटला तर गैर काहीच नाही. परंतु शहरात आणखी चांगले काय काय होऊ शकते याबाबत माहिती महानगरपालिकेचे अधिकारी व संबंधित खात्याने जिल्हाधिकाऱ्यांपुढे नियोजनासहीत सादर केल्यास शहर आणखी चांगले करण्यास ते उपयुक्त होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी शहराचा मास्टर प्लॅन डोळ्यासमोर ठेऊन कामाला सुरूवात केल्यास ते प्रभावी होईल.
जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्याचा कारभार पहायचा आहे. परंतु या मोठ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाचा चेहराच अनेक बाबींनी विद्रुप करून टाकलेला आहे. प्रलंबित कामे, बेशिस्त वाहतूक, अरूंद रस्ते, मनमानी फळ व भाजीपाला विक्रेते आणि तसलेच रिक्षा चालक व वाहनधारक यांच्या उपद्रवाचा अतिरेक झाला आहे. बेशिस्तीलातीला पाठिशी घालणारे व पाठबळ देणारांचाही बिमोड करावा लागणार आहे.
नाट्यगृहांचा पाठपुरावा व्हावा-
येथील रंगभवनामध्ये अनेक नामवंत कलाकारांनी आपली कलासादर केलेली आहे. त्याची दूरवस्था म्हणजे नेते व जाणत्यांमधील सांस्कृतीक संवेदना किरकोळ स्वार्थापोटी हरवत चाललेल्याचे लक्षण आहे. दरम्यान चार-पाच वर्षांपुर्वी मनपाने येथे आधुनिक नाट्यगृहाचा प्रस्ताव सरकारला सादर केलेला आहे. त्यात खाली वाहनतळ, लगत व्यापारी गाळे व वरच्या भागात नाट्यगृह असा प्रस्ताव आहे. तो सरकार दरबारी धूळ खात आहे. ती धूळ झटकायला जाण्याची इच्छाशक्ती नगरमध्ये नाही. कदाचित भविष्यात रंगभवनाची एवढी मोठी जागा एखाद्या शिक्षण साम्राटाच्या घशातही जाऊ शकेल. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यास राज्य सरकारकडून निधी प्राप्त होऊन रंगभवनाला उर्जितावस्था येऊ शकते. तर सावेडीतील नाट्यगृह बीओटी तत्त्वावर करण्याचा मनपाचा प्रस्ताव आहे. ऐतिहासिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या शहरात मनपाकडे एकही नाट्यगृह नसणे भूषणाची बाब नाही. परंतु याचे कसलेच सोयरसुतक येथे नाही.
जुन्या मनपातील सभागृह –
अनेक दिग्गज कलाकारांच्या संगीत मैफिली, नामवंतांची व्याख्याने, प्रसिद्ध नेत्यांचे मार्दर्शन लाभलेले जुन्या मनपातील सभागृह जळून खाक झालेल्याला आता पाचवर्ष उलटली. विविध तैलचित्रांसह आकर्षक रचनेच्या या सभागृहाने नगरचा मोठा राजकीय इतिहास पाहिला होता. त्याच्या जळीताबरोबरच त्याचे सारे वैभव खाक झाले. येथील संवेदनाहीन नेत्यांना या सभागृहाच्या वेदना कधीच जाणवल्या नाहीत. अन्यथा त्याचे पुनरनिर्माण पुर्वीच झाले असते. जिल्हाधिकारी या प्रकरणातही लक्ष घालू शकतात.
पिंपळगाव माळवी जमीन व तलाव –
मनपाची जमेची बाजूम्हणजे पिंपळागाव माळवी येथील 335 हेक्‍टर क्षेत्र. यासाठी नगररचनाकार संतोष धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त तहसीलदार सर्जेराव शिंदे, रविंद्र जेवरे व खलील पठाण यांच्या पथकाने विशेष प्रयत्न करत याचा लढा जिंकला. स्वतःची एवढीमोठी जागा असलेल्यापैकी राज्यातील ही अपवादात्मक मनपा असावी. या जागेत ब्रिटीश कालीन तलाव आहे. तेथे अत्याधुनिक पर्यटनस्थळ, देखणी बाग उभारणे शक्‍य आहे.
जुन्या जागेचा वाद –
मनपाची जुनी जागा मनपाच्या हातून निसटते की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. हे प्रकरण सध्या नाशिकच्या आयुक्तांकडे दाखल आहे. वरील पथकच या कामातही मेहनत घेत आहे. परंतु त्यांना पूरक प्रशासकीय मदत जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्यास कोट्यवधी रूपयांची मनपाची जुनी जागा मनपाच्याच ताब्यात राखण्यास मदत मिळू शकते.
रखडलेली फेज टू –
कोट्यवधींची फेज टू योजना कामाचा प्राधान्यक्रम बदलल्याने रखडली. हे काम झाल्याने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. टॅंकरची गरज भासणार नाही. त्यासाठी उनगरांच्या जलवाहिन्या व आवश्‍यक तेथे टाक्‍या उभारणे गरजेचे आहे. कामाचा दर्जा देखील महत्वाचा आहे. मात्र ही योजना देखील राजकीय कुरघोड्यांत अडकत आहे.
शहर व उपनगरांतर्गत रस्ते –
शहरातील रस्त्यांची अवस्था आनेक ठिकाणी वाईट झाली आहे. तर अनेक नव्या उपनगरांमधे रस्तेच असित्त्वीत नाहीत. अशा उपनगरीय बांधकामांच्या वेळी विकासकांकडून मनपाने निधी जमा करून घेतलेला असतो. मात्र त्याचा वापर त्याच भागाच्या प्राथमिक गरजांवरही केला जात नाही. त्यामुळे अनेक उपनगरातील रहिवाशांची रस्ते, पथदिवे व पाण्याअभावी कुचंबणा होत आहे.
अशा अनेक कामांबाबत नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाडीच्या भूमिकेमुळे नवा आशावाद निर्माण झाला आहे. त्यात मनपाच्या वसूलीमध्ये सूसूत्रता आणणे, सेवानिवृत्तांची सर्व देयके व शिक्षकांचे पगार वेळेत होण्याचे नियोजन, पाणी पुरवठा व पथदिव्यांपोटीची विजेची देयके वेळेत अदा होणे, ठेकेदारांचीही देयके मानकांनुसार अदा केली जाणे अशी मोठी आर्थीक शिस्त आवश्‍यक आहे. आता एकट्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या कर्मचाऱ्यांची तत्त्पर साथ आवश्‍यकता आहे. तसेच येथील जनतेने देखील सकारात्मक भूमिका घेत पाठबळ देण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)