#नवे क्षितीज : बहुविध बुद्धिमत्ता

ऍड. सीमंतिनी नूलकर 

सांगितिक बुद्धिमत्ता Musical, Rhythmic Harmonic Intelligence

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण गार्डनरने पाहिलेल्या संकल्पना समजून घेऊ. सांगितिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्‍तींना Sound smart म्हणतात. अशा व्यक्ती शिकतात ते ऐकून-कर्णेंद्रियाचा वापर करून auditory style – काही व्यक्‍ती अशा असतात की त्यांना संगीताची जात्याच आवड असते. सूर, ताल, चटकन समजतो. राग ओळखता येतात. वाद्यांविषयी विशेष आत्मियता असते. तर काही पूर्ण “औरंगजेब’ असतात. नाहीच आवडत त्यांना संगीत! काहींना आवडतं पण “ठीक आहे’ इतपत. सांगितिक बुद्धिमत्ता किती विकसित आहे, आहे का नाही हे यावरून लक्षात येईल. अगदी लहान मुलंसुद्धा उत्कृष्ट गाताना, वाजवताना आपण पाहतो-ऐकतो. डॉ. गार्डनर म्हणतात तेच हे – ही बुद्धी उपजत असते पण प्रमाण कमी, फार कमी, जास्त असं ते असतं!

सांगितिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्‍ती म्हणजे संगीतकार, गीतरचनाकार, वादक, गायक अशा व्यक्ती सूरांसाठी वेड्या असतात. त्यांनी हातात घेतलेली गोष्ट पार्श्‍वभूमीवर संगीत असल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. सांगितिक बुद्धिमत्ता असणं म्हणजे राग, शास्त्रीय संगीत समजणं- असं नाही. हा वेगळा भाग आहे. गाणं म्हणता येणं न येणं हाही वेगळा मुद्दा आहे. “तानसेन’ असायलाच हवं असं नाही. “कानसेन’ तरी असणं महत्त्वाचं- आवश्‍यक!
अलीकडे कविता, पाढे यांचे पाठांतर हा विषय लुप्तच झालाय. याचा खरंच काही फायदा होता का? तर नक्कीच होता. एकतर तालासुरात, चालीत म्हटलेल्या कविता, गाणी, पाढे कधीच विसरत नाहीत. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे- ही समूहाने केलेली कृती- ती एक वेगळेच बंध निर्माण करते. समूहाच्या स्वास्थ्यासाठी असे बंध, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गरजेचे असतात.

संगीताचा परिणाम नेहमीच सकारात्मक असतो. गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणे, त्यांना संगीत ऐकवल्यामुळे वाढते. झाडांच्या बाबतीत असे प्रयोग झालेले आहेत. साधा संवाद साधतानासुद्धा स्वर चढा नसेल, मंजूळ असेल तर भाषाशैलीवरून, स्वरामुळे वाद होण्याचे प्रसंग कमी. एकमेकांतील नातेसंबंध समाजातील संबंध यातला ताण कमी करण्यासाठी उपयोग होतो. मात्र, त्यासाठीची जाणीव जागृत व्हायला हवी. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे. प्रत्येक सजीवाच्या जगण्याला सुद्धा एक सूर, लय, ताल असतो. जीवनसंगीत असा एक शब्द प्रचलित आहे ना. हेच जीवनसंगीत गवसणं, जगण्याचा सूर सापडणं महत्त्वाचं! स्वतःसाठी, समाजासाठी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठीसुद्धा!

शारीरिक किंवा कायिक बुद्धिमत्ता Bodily-Kinesthetic Intelligence
शारीरिक बुद्धिमत्ता म्हटलं तर हसू येईल. हे काय नवीनच, असं वाटू शकेल! पण याही प्रकारची बुद्धिमत्ता अस्तित्वात असते आणि ती समजून घेण्यासारखीही आहे. शारीरिक किंवा कायिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींना body smart म्हणतात. अशा व्यक्तींना देशाबद्दल-शरीराबद्दल एक जागरूकता असते- Sense of body awareness. शारीरिक बुद्धिमत्ता विकसित असलेल्या व्यक्तींची उदाहरणं दिली तर ही संकल्पना चटकन समजते. एक उदाहरण नर्तकाचे किंवा अभिनेत्यांचे. दुसरे शल्यविशारदाचे- तिसरे खेळाडूचे. डोळे, मेंदूसारख्या नाजूक भागाचे ऑपरेशन करणाऱ्या सर्जनच्या हाताची, बोटांची, डोळ्यांची हालचाल किती लयबद्ध, कौशल्यपूर्ण असते. हेच, साधं जेवतानाही सगळी बोटं, हात बरबटून, ताटाबाहेर अंगावर सांडून जेवणारेही आपण पाहतो. हाच तो फरक – शारीरिक बुद्धिमत्ता प्रगल्भ असल्या-नसण्याचा! नृत्यांगना, अभिनेते यांच्या शरीरात एक उपजत ताल, लय असते. हालचालीतून भाव, भावनांचे आविष्कार घडवण्याची क्षमता असते. नाहीतर सगळ्यांना कुठं नाचता येतं? किंवा अभिनय करता येतो? आणि पुन्हा, आपण पाहतोच ही आवड हा पैलू काहींना जात्याच असतो. “देहबोली’ Body language ही अलीकडची एक लाडकी संकल्पना आहे. कोणीही हल्ली छातीठोक सांगतं- “अमुक एक व्यक्ती खोटं बोलत होती. तिच्या देहबोलीवरूनच कळत होतं.’ खरंच आहे. देहबोलीवरूनसुद्धा कळतंच! ही देहबोली कायिक बुद्धिमत्तेशी संलग्न आहे. देहबोलीचा वापर, सकारात्मक आणि सुसंवादासाठी नक्की करता येऊ शकतो. कायिक बुद्धिमत्ता, सांगितिक बुद्धिमत्तेबरोबर हातात हात घालून असणारी बुद्धिमत्ता आहे. कायिक बुद्धिमत्ता पुरेशी असेल, प्रगल्भ असेल तर अशा व्यक्तींचे sense of timing जबरदस्त असते, शरीर मनाचे संतुलन त्यांना साधता येते. शारीरिक बुद्धिमत्तेचा वापर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी असतो. खेळाडू, कलाकार यांच्याकडे जनमानसाला आकृष्ट करण्याची एक क्षमता असते. त्यामुळेच त्यांच्या सहयोगाने जगभर Peace Missions होतात, शांतीसाठीचे प्रयत्न केले जातात. म्हणजेच समाज कल्याण, मानव कल्याण हा विषय शारीरिक बुद्धिमत्तेला जोडलेला आहेच.

भाषिक/मौखिक बुद्धिमत्ता Linguistic intelligence

भाषिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती म्हणजे लेखक, कवी, वक्ते, वकील- या व्यक्तींना ‘Word smart’ म्हणतात. भाषिक बुद्धिमत्ता विकसित असलेल्या व्यक्ती शब्दातून योग्यप्रकारे व्यक्त होतात, होऊ शकतात. स्वतःला जे म्हणायचंय, सांगायचंय ते सुयोग्यरीतीने संयत पद्धतीने सांगतात.

काही व्यक्तींची भाषिक बुद्धिमत्ता विकसीत असते. काहींच्या या प्रकारच्या बुद्धिमत्तेचा स्तर कमी प्रतीचा असतो. काही व्यक्ती अजिबात बोलत नाहीत; किंवा फार कमी बोलतात. म्हणजे त्यांच्या मनात विचार खूप उसळत असतात. त्यांना खूप काही म्हणायचं असतं, सांगायचं असतं पण शब्द सुचत नाहीत, शब्दात मांडता येत नाही. अशा व्यक्तींबद्दल एक समाज असतो की ती व्यक्ती “आतल्या गाठी’ची आहे, न बोलून शहाणी आहे वगैरे. पण हे सर्वकाळ खरे नसते. या व्यक्त न होण्यामागे शास्त्रीय कारण आहे- ते म्हणजे त्यांची भाषिक बुद्धिमत्ता पुरेशी विकसीत नसते. अबोल व्यक्तींमुळे जे समज-गैरसमज होतात ते बरेचदा चुकीचे, एकतर्फी असतात. पण बोलभांड, आक्रस्ताळ्या व्यक्‍तीबाबत मात्र तसं खात्रीनं म्हणता येत नाही. शब्द वापरताना अशा व्यक्‍ती त्यांच्या अर्थाचा/परिणामांचा अजिबात विचार करत नाहीत.

उचलली जीभ लावली टाळ्याला असा खाक्‍या असतो. अशा व्यक्‍ती सोयीस्करपणे “मला तसं नव्हतं म्हणायचं,’ किंवा “बोललोच नाही तसं’ असंही म्हणून शकतात. एखाद्या कुटुंबात अशी व्यक्‍ती असेल तर? वाचाळ, तोंडाळ नवरा किंवा बायको, सासू? कसे असतात कौटुंबिक संबंध? कुटुंबातल्या मुलांवर त्याचे काय परिणाम होतात? किंवा भांडकुदळेपणामुळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी, सामाजातील घटकांशी कसे राहतात संबंध? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा कुटुंबस्तरावर, ज्या समाजात आपण राहतो त्या त्या समाजस्तरावरचा विचार झाला. हाच भाषिक बुद्धिमत्तेचा विषय विस्तारानं विचारात घेण्यासारखा आहे.
(समाप्त) 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)