नवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे!

 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मिळकतकराच्या थेरगाव व सांगवी विभागीय कार्यालयांतर्गत नव्या मिळकतींचे सर्व्हेक्षण कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी करणार आहेत. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत हे काम केले जाणार आहे. त्याकरिता प्रत्येक नव्या मिळकतीच्या स्वतंत्र अर्जाकरिता संबंधित विद्यार्थिनीला 20 रुपये मोबदला मिळणार आहे.

तत्कालीन आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मिळकतींचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये शेकडो मिळकती नव्याने आढळल्या होत्या. या सर्व मिळकतींची महापालिका दप्तरी नोंद करण्यात आली. त्यामुळे करसंलन विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. दरम्यान, शहराच्या विविध भागांमध्ये अनेक गृहप्रकल्प व नव्या मिळकती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक मिळकतींची महापालिका दप्तरी नोंद नाही. आता पुन्हा एकदा शहरातील नव्या मिळकतींचा आढावा घेण्यात येणार आहे.
महापालिकेच्या करसंकलन विभागाची शहराच्या विभागात एकूण 16 कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांकडून मिळकती व मोकळ्या जमिनींवर कर आकारणी केली जाते. थेरगाव विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 98 हजार 227, तर सांगवी विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 53 हजार 657 अशा एकूण 1 लाख 51 हजार 944 मिळकतींची नोंद आहे. या सर्व्हेक्षणात किमान 10 टक्के नव्या मिळकती आढळतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

ऐनवेळच्या विषयाला मान्यता…
महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या या सर्व्हेक्षणात संबंधित सहाय्यक मंडलाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली केले जाणार आहे. त्यामध्ये गट लिपिक किंवा मुख्य लिपिक यांच्यासमवेत या विद्यार्थिनी हे सर्वेक्षण करणार आहेत. त्याकरिता मिळकतीच्या सर्वेक्षणासाठी प्रति फॉर्म 20 रुपये मोबदला दिला जाणार आहे. या सर्वेक्षणाकरिता एकूण तीन लाख चार हजार इतका खर्च अपेक्षित आहे. करसंकलन विभागाकडे सन 2018-19 चे सुधारित आणि सन 2019-20 च्या मुळ अंदाजपत्रकात मिळकत सर्वेक्षण या उपशिर्षावर तीन लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. हा ऐनवेळचा विषय स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता. या खर्चास स्थायीने मान्यता दिली आहे.

आयटीआय निदेशकांच्या मानधनात वाढ
महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयमध्ये 18 वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या निदेशकांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निदेशकांना सध्या 25 हजार मानधन मिळत असून, त्यांच्या नियुक्‍तीला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. आता या निदेशकांना दरमहा 40 हजार रुपये मानधन मिळणार आहे. महागाईचा विचार करून, ऐनवेळच्या विषयाला स्थायीने मान्यता दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.