#नवीन काय वाचाल?: विचारांची सजग लढाई : “मोघ पुरुस’ : प्रतीक पुरी 

डॉ. राजेंद्र माने
काळाच्या पटलावर काही काही कादंबऱ्या वेगळं वळण घेऊन येतात. प्रतीक पुरी यांची “मोघ पुरुस’ त्यातील एक कादंबरीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ती वाचकांना विचार करायला लावते. परंपरेनं आमच्या माथी काय काय मारलंय त्याची चिकित्सा ही कादंबरी करते. त्यामुळे आजच्या भोवतालात या कादंबरीचं महत्त्व जास्त आहे. देव, प्रेम, श्रद्धा-अंधश्रद्धा, धर्म, या सर्वांचा वेगळा विचार मांडताना प्रतीक पुरी यांनी जोशुआ, गौतम, कृष्ण यांच्या चर्चात्मक मांडणीचा आधार घेतला आहे. एक दृष्टीने मानवी मूल्यांचा समप्रमाण शोध घ्यायचा यशस्वी प्रयत्न ही कादंबरी करते.
ही कादंबरी विचारांची लढाई लढते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राम, कृष्ण यांचा देव म्हणून विचार करण्यापेक्षा त्यांना महामानव मानून, मानुषीकरण करून मग त्यांच्या विचारांचा वेध घेते. कारण त्यांना देव मानण्यामुळे एक प्रकारचं समाजाचं वर्षानुवर्षे शोषण होत राहिलं आहे. त्यांना माणूस मानलं की, मग खूप कोडी उलगडत जातात. कृष्णानं सांगितलेल्या गीतेकडे लेखक वेगळ्या चिकित्सेच्या दृष्टीतून पाहतो. तो एका ठिकाणी म्हणतो, गीता आणि कृष्ण जर बदनाम झाले असतील तर हे दांभिक ब्राह्मणांमुळे, ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भाषेचा तिजोरीसारखा उपयोग केला आणि त्याच्यात सारं ज्ञान लपवून ठेवलं. त्याचे विकृत अर्थ काढून स्वतःचा स्वार्थ तेवढा त्यांनी साधला. गीतेचा अर्थ कसा काढायचा, हे वाचणाऱ्यावर अवलंबून आहे. एरवी रणांगणात युद्ध करण्यासाठी सांगितली केलेली ही गीता देव्हाऱ्यात जाऊन बसली नसती.’
कृष्णाला देव मानण्यापेक्षा महामानव मांडून त्यांचं खरं रूप ध्यानी आणून देण्याचा प्रयत्न लेखक करतो. माणसाला जगण्यासाठी कशाचा तरी आधार लागतो. मग तो देव निर्माण केला गेला. लेखक इथे मांडणी करतो की देव मानणं ही माणसाच्या दुबळ्या भावनिक मानसिक अवस्थेचं लक्षण आहे. त्याची ती गरज आहे. सर्व काही देवावर सोडून तो मोकळा होतो. काही लोक मग देवाच्या नावाखाली समाजाच्या या दुबळ्या मानसिकतेचा फायदा घेतात. धर्म हे त्याचंच रूप आहे असे लेखक म्हणतो. मग धर्माच्या नावाखाली माणूस कसा भरडला गेला हे वेगवेगळ्या महामानवांच्या चर्चात्मक मनोगतामधून मांडण्याचा प्रयत्न लेखक करतो. काही वेळा लेखक म्हणून स्वतःचं चिंतनही मधून मधून व्यक्‍त करतो. मला वाटतं ही कादंबरी म्हणजे विचारांचा एक सजग प्रवास आहे. मधूनच मनाच्या माध्यमातून या चर्चेची आंदोलन पेलण्याचा प्रयत्न होतो.
यीात वेताळ, ज्ञानेश्‍वर, तुकाराम, विवेकानंद, शंबुक, आदी शंकराचार्य, गालिब, आंबेडकर, अश्‍वत्थामा अशा अनेक महामानवांच्या विचारांची, त्यांच्या आयुष्यातील घटनांची त्यांच्या साहित्याची चिकित्सा प्रतीक पुरी यांनी केली आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध अनेक धर्मातील तत्त्वज्ञान मांडताना माणूस समजून देण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. देव आणि धर्माकडे थोड्या वेगळ्या खिडकीतून पाहणं या कादंबरीतून वाचकांना घडेल. धर्म कशासाठी निर्माण केला गेला? त्यातून माणसाची उन्नती झाली का? का त्या नावाखाली माणसाचं शोषण झालं? हे प्रश्‍न निर्माण करताना देव आणि धर्म हे माणसाच्या समाधानासाठी शोधून काढण्यात आलेलं तत्त्वज्ञान आहे. पण याचं काळानुरुप काय झालं आहे?
हे माणसाच्या मुळावरच उठलंय.
जाती-जातीत, धर्मा-धर्मात माणसाला विभागून यांच्यात स्वार्थासाठी माणूसच दंगे निर्माण करायला लागलाय. पिढ्या न पिढ्या यात भरडू लागल्या आहेत. प्रेम जे माणसाच्या मनात शांती निर्माण करेल ते प्रेम उरलं आहे का? माणसातलं माणूसपण संपून हळूहळू माणसाचा सैतान होऊ पाहतोय. अशावेळी माणसाला, समाजाला काही प्रश्‍न विचारून त्यांना जागं करणारी ही कादंबरी आहे. देव, धर्म, श्रद्धा अंधश्रद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे. प्रश्‍न विचारून चिकित्सा होऊ नये याचे प्रयत्न सातत्याने झालेत पण असे प्रश्‍न “मोघ पुरुष’ विचारतील. खूपजणांना असे प्रश्‍न विचारणं आवडणार नाही. कारण त्यामागे कदाचित त्यांचा काही स्वार्थ दडलेला असू शकेल पण समाजाला शहाणं करण्यासाठी अशा मोघ पुरुषाची गरज आहे, असं प्रतीक पुरी यांनी या कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक वेगळं तत्त्वज्ञान घेऊन ही कादंबरी आली आहे. देवाचं अस्तित्व तपासण्याचा प्रयत्न यातून झाल्यामुळे खूप जणांना ती पटणार नाही.
पण प्रत्येक मुद्द्यामधून लेखकाने युक्‍तिवाद मांडल्यामुळे ते बऱ्याचवेळा वाचकांना पटत जाईल याचा भरवसा पुरी यांनी निर्माण केला. वाचकांनी आवर्जून वाचून स्वतःच्या मतांना तपासून घ्यायला ही कादंबरी भाग पाडेल हे मात्र नक्‍की.
मोघ पुरुस : प्रतीक पुरी : विश्‍वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे, किंमत रु. 250/-
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)