नळ चोरीला गेल्याने शेकडो पाण्याची नासाडी

पुणे – पुणे महापालिकेच्या विस्तारीत भवनामागील शुक्‍लकाष्ठ थांबायचे नाव घेईना. इमारतीच्या उद्‌घाटनाच्याच दिवशी पावसात छतातून थेट सभागृहात पाणी गळण्याच्या घटना अजूनही ताजी असताना आता थेट इमारतीतून सार्वजनिक शौचालयातील नळच चोरीला गेल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले. ही बाब सकाळी लक्षात आल्यानंतर शौचालयातील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने जवळपास दिवसभर पाण्याअभावीच शौचालयांचा वापर सुरू होता. या घटनेमुळे महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिका भवनची विस्तारीत चार मजली इमारतीत सजावटीची कामे सुरू आहेतच. या इमारतीमध्ये महापौर, उपमहापौर आणि पक्षांच्या कार्यालयांसह मुख्य सभा हॉल, विषय समित्या आणि नगरसचिव यांचे कार्यालय आहे. चारही मजल्यांवर पुरूष आणि महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालये आहेत. पाश्‍चात्य आणि भारतीय पद्धतीच्या या शौचालयांमध्ये चांगल्या दर्जाचे नळ बसविण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी प्रत्येक मजल्यावर तीन- चार शौचालयातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. शौचालयातील नळ उघडे राहिले असावेत या समजातून ते बंद करायला गेल्यानंतर नळच गायब झाल्याचे लक्षात आले. प्रत्येकच मजल्यावर ही परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर खळबळच उडाली.

तातडीची उपाययोजना म्हणून शौचालयांना पाणी पुरवठा करणारा मुख्य नॉब बंद करण्यात आला. तो सुरू ठेवता येत नसल्याने शौचालयातील पाणी बंद झाले. पाण्याविना कर्मचारी आणि नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. विशेषत: महापालिका महिला कर्मचाऱ्यांनाही यामुळे मनस्ताप सोसावा लागला.

नळ चोरीला गेल्याची घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. दुरूस्तीचे कामही भवन विभागाकडून करण्यात येत आहे. इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींचेही फुटेजही तपासण्यात येत आहेत.
-एस.जी. केंजळे, सुरक्षा विभाग अधिकारी, मनपा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.