नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी आपण सारे एक

आमदार पृथ्वीराज चव्हाण:उदयनराजेंच्या प्रचारार्थ रेठरे येथे सभा

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी)-ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे सांगत सत्तेवर आलेले भाजप सरकार प्रत्यक्षात आजवरचे सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. हुकुमशाही वृत्तीच्या नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी आपण सारे एक झालो आहोत. काहीही झाले तरी पुढील प्रंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील, या निर्धाराने प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. रेठरे, ता. कराड येथे राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आंदराव पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड जनता बॅंकेचे राजेश पाटील वाठारकर, ऍड. राजाभाऊ पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखवत 2014 च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने केवळ 31% मते मिळवली होती. विरोधातील 69 % मते मिळालेल्या सर्वांची मुठ बांधून आता भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आपण सारे सिद्ध झालो आहोत, असे सांगून आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, वास्तविक ज्यांनी शून्यातून भाजप उभा केला अश्‍या नेत्यांनाही मोदी आणि शहा या जोडगोळीने या निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. लालकृष्ण अडवाणी, सुमित्रा महाजन, मुरलीमनोहर जोशी अश्‍या नेत्यांना सक्रिय राजकारणातून बाहेर ठेवण्याचा कृतघ्नपणा सत्तेची ऊब लागताच भाजपच्या सध्याच्या नेतेमंडळींनी केला आहे. आपल्या पक्षातील ज्येष्ठांना अशी वागणूक मिळत असेल तर नरेंद मोदी जनतेला काय सांभाळून घेणार?
खा. श्री. छ उदयनराजे म्हणाले की, आपला देश कृषीप्रधान असून देशाची आर्थिक नाडी आणि अर्थसंकल्पसुद्धा शेतीवर आधारित असायला हवा. मात्र नोटबंदीं, जीएसटी आणि रेरासारखे निर्णय अक्षरशः झोपेत घेत मोदींनी देशाची अर्थव्यवस्था खीळखीळी केली. छत्रपती शिवरायसुद्धा अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून कोणताही निर्णय घेत असत. मात्र कोणाचाही सल्ला न घेता मोदी आपलीच मनमानी संपूर्ण देशावर लादत आहेत. मन की बात करीत सत्ता मिळवलेल्या या सरकारने हातामध्ये सत्ता येताच घेतलेल्या अविचारी निर्णयांमुळे जनतेची अक्षरशः धुळदाण केलेली आहे. जनतेची केवळ मते त्यांनी मिळवली, मात्र जनतेच्या वैचारिक मतांची काहीच किंमत ठेवली नाही. देशाची नैसर्गिक संपत्ती काही ठराविक उद्योजकांच्या दावणीला बांधून जनतेला अक्षरशः ओरबाडण्याचे काम या सरकारने केले आहे.
मतदारसंघाच्या संपूर्ण विकासाचे आश्वासन देत, एक बार मैने कमिटमेंट कर दी, हा प्रसिद्ध डायलॉग खा. उदयनराजे यांनी सादर करताच उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.