नमो टीव्ही चॅनेल बद्दल निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

नवी दिल्ली – निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर केवळ भाजप आणि मोदींचा एकतर्फी प्रचार करण्यासाठी नमो टीव्ही चॅनल ही दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने या विषयी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अहवाल मागवला आहे.

या वाहिनीला मोदींचेच नाव देण्यात आले असून त्याच्या लोगोवरही केवळ मोदींचाच फोटो वापरण्यात आला आहे. त्या वाहिनीचा पुरस्कार भाजपच्या सोशल मिडीयासेल कडून केला जात आहे. तथापी त्या वाहिनीचा नेमका मालक कोण हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. देशातील सर्व डीटीएच कंपन्यांकडून या वाहिनीचे प्रसारण सुरू आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर देशात अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेल्या खासगी वाहिन्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे पण या यादीत नमो वाहिनीचे नाव नाही.

या संबंधात आम आदमी पक्षाच्या वतीने जे तक्रार निवेदन आयोगाला देण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की नमो टीव्हीच्या नावाने एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार करणारी अशी स्वतंत्र वाहिनी सुरू करण्यास सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे काय? आणि निवडणूक आचार संहिता सुरू असताना अशी अनुमती देता येते काय याची चौकशी केली जावी.

फक्त भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी अशी स्वतंत्र वाहिनी सुरू करण्यास अनुमती कशी काय देण्यात आली आणि त्यात दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर कोणाचे नियंत्रण आहे काय याची चौकशी केली जावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. या तक्रारीवरून आता निवडणूक आयोगाने सरकारकडून अहवाल मागवला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.