नदी प्रदूषणावर नुसताच पत्रप्रपंच

  • प्रदूषण नियंत्रणासाठी “एमपीसीबी’कडे कृती आराखडा सादर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान ठरलेल्या तीन नद्या आज प्रदुषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रदुषणामुळे या नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता घसरत चालली आहे. आतापर्यंत ठोस कार्यवाही होणे आवश्‍यक होते. परंतु प्रदुषणामुळे जलचरांच्या मृत्यूनंतर जागे झालेले प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आता नुसताच पत्रप्रपंच करताना दिसत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला नोटीस बजावते आणि नंतर महापालिका उत्तर देते. याच पत्रप्रपंचामध्ये आता महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कृती आराखडा सादर केला आहे.

पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीचे प्रदूषण कमी करण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका काय उपाययोजना करीत आहे, याबाबतचा कृती आराखडा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नुकताच सादर करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र सांडपाणी नलिकांचे जाळे उभारण्यात येणार आहे. तसेच, नव्याने 4 मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजित आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. मैलाशुद्धीकरण केंद्रांच्या येथे पाण्याची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा अद्ययावत केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पवना नदीपात्रामध्ये गेल्या वर्षभरात दोनदा मासे मृत पावण्याच्या घटना घडल्या आहेत. पहिल्यांदा मे महिन्यात थेरगाव येथील केजुदेवी बंधारा येथे ही घटना घडली. त्या प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा 4 डिसेंबरला मासे आणि कासव मृत पावण्याची घटना घडली होती. महापालिकेच्या विरोधात खटल्याचा प्रस्ताव का दाखल करू नये, अशा आशयाची नोटीस “एमपीसीबी’कडून बजावण्यात आली होती. तसेच, महापालिकेला कृती आराखडा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने नुकताच एमपीसीबीकडे विस्तृत आराखडा सादर केला आहे.

पवना नदीपात्रात थेरगाव येथे थेट मिसळणाऱ्या 4 नाल्यांतील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित सांडपाणी जवळच्या मैलाशुद्धीकरण केंद्रांकडे वळविण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पवना नदीजवळील सांडपाणी नलिकांमधील गळती शोधुन त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

आणखी दोन वर्षे नद्या प्रदूषितच
पवना नदीपात्राला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी महापालिकेकडून नदीपात्रावर साचणारी जलपर्णी नियमितपणे काढण्यात येणार आहे. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीपात्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहरभरात सांडपाणी नलिकांचे जाळे करण्यात येणार आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे. त्याशिवाय, सांडपाणी नलिकांमध्ये ठिकठिकाणी असलेली गळती काढली जात आहे. महापालिकेचे सध्या 14 मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यांची एकूण क्षमता 353 एमएलडी इतकी आहे. सध्या 312 एमएलडी इतके सांडपाणी शहरात निर्माण होत आहे. मात्र, शहरात सध्या सांडपाणी नलिकांचे जाळे विस्तारलेले नसल्याने 265 एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जात आहे. याचाच अर्थ की अजून दोन वर्ष सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत मिसळत राहणार आणि नद्या प्रदूषित होत राहणार.

चार मैलाशुद्धीकरण केंद्रांचे नियोजन
महापालिकेकडून ताथवडे (10 एमएलडी), बोपखेल (5 एमएलडी), चिखली (12 एमएलडी), पिंपळे निलख (15 एमएलडी) अशा चार मैलाशुद्धीकरण केंद्रांचे नियोजन आहे. या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रांचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे कृती आराखड्यात स्पष्ट केलेले आहे. सध्या महापालिकेकडून प्रक्रिया केलेले 10 एमएलडी सांडपाणी सीएमईला आणि पिंपरी डेअरी फार्मला 5 एमएलडी पाणी वापरासाठी (नॉन डोमेस्टिक पर्पज) देण्यात आले आहे. महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत मैलाशुद्धीकरण केंद्रांचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याशिवाय, मैलाशुद्धीकरण केंद्राच्या येथील पाण्याची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा अद्ययावत केली जाणार असल्याचे कृती आराखड्यात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.