नगर रस्ता मेट्रोला “ब्रेक’

राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने नाकारली परवानगी


निर्णयामुळे महामेट्रोसमोरील अडचणीत वाढ

पुणे : महामेट्रोच्या नगररस्त्यावरील कामाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणानेने (नॅशनल मॉन्युमेंट अथॉरीटीने) परवानगी नाकारली आहे. या मार्गावरील कामाच्या शेवटच्या टप्प्यात रामवाडीजवळ असलेल्या आगाखान पॅलेस राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने त्या भागाच्या 100 मीटर परिसरात काम करण्यास बंदी आहे. त्यामुळे महामेट्रोकडून या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागण्याचा प्रस्ताव या समितीस पाठविण्यात आला होता. मात्र, प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे महामेट्रोसमोरील अडचण वाढली आहे.

महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी या मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गातील वनाज ते धान्य गोदाम हे काम सुरू झालेले असून धान्य गोदाम ते रामवाडी हे काम मागील आठवड्यातच महामेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग रामवाडी येथे संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी अवघ्या 100 मीटरवर आगाखान पॅलेस असून ते राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषीत आहे. त्यामुळे या स्मारकापासून 100 मीटर अंतरावर काम करताना त्यासाठी राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाची मान्यता लागते. ही बाब लक्षात घेऊन महामेट्रोने त्याबाबतचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, प्राधिकरणाने आगाखान पॅलेसच्या प्रवेशद्वारापासून मेट्रोचे काम अवघ्या 20 ते 30 मीटर अंतरावरच असल्याने या कामास ना हकरत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महामेट्रोची अडचण वाढली असून हा मार्ग आता बदलनेही शक्‍य नाही, कारण ज्या भागात परवानही नाकरली आहे, त्याच्या पलिकडील बाजूस लष्कराची जागा आहे. तसेच सध्याचा मार्ग लष्कराच्या जागेतून घेऊन जायचा झाल्यास त्यासाठी मेट्रोच्या सध्याच्या मार्गात बदल करावा लागणार असून पुन्हा लष्कराच्या जागेसाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार आहे. परिणामी या कामाचा खर्चही वाढण्याची शक्‍यता असून ही प्रक्रिया वेळखाऊ ठरणार आहे. त्यामुळे महामेट्रोची चांगलीच अडचण झाल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुन्हा बाजू मांडणार
या निर्णयानंतर महामेट्रोकडून प्राधिकरणासमोर पुन्हा बाजू मांडली जाणार असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता आगाखान पॅलेसच्या मुख्य इमारतीपासून महामेट्रोचे खांब सुमारे 108 ते 110 मीटर लांब अंतरावर आहेत. मात्र, प्राधिकरणाकडून हे अंतर इमारतीच्या प्रवेशद्वारापासून मोजण्यात आले आहे. त्यामुळे हा निर्णय झालेला असून महामेट्रोकडून त्याबाबत पुन्हा एकदा योग्य पध्दतीने आपली बाजू मांडण्यासाठी समितीकडे अपील करण्यात आले आहे. तसेच प्राधिकरणाचा निर्णय कायम राहिल्यास महामेट्रोकडून इतर पर्यायांची चाचपणी करण्यात येत असल्याचा खुलासाही महामेट्रोकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)