टाकळीभान, (वार्ताहर) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणाची बाजी लावून पुन्हा गेल्या दहा दिवसांपासून आमरण उपोषण करीत असलेले संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ५० चारचाकी गाड्यांचा ताफा घेऊन शेकडो समाज बांधव सोमवारी सकाळी अंतरवाली सराटीकडे रवाना होणार आहे.
यासाठी टाकळीभान सकल मराठा समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने पूजा, आरती करून ५० हून अधिक गाड्यांचा ताफा अंतरवाली सराटीकडे कुच करणार आहे. या सर्व वहानांनी क्रमांक देण्यात आलेले आहे. प्रवासात ही सर्व वाहने दिलेल्या क्रमांका नुसारच एकापाठोपाठ चालणार आहेत. अत्यंत शांततेने हा प्रवास केला जाणार आहे.
सर्व वाहनांना झेंडे व छत्रपती शिवाजी महाराज व संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे बॕनर लावले जाणार आहे. उपोषणस्थळी भेट देऊन या संघर्ष योध्द्याला टाकळीभान सकल मराठा समाजाच्या वतीने पाठींबा देण्यात येणार आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सरकारने त्वरीत मान्य करावी, अशी मागणी सकल मराठा समाज करीत आहे.