नगर जिल्ह्यातील साडेसहा लाख लोक दुष्काळाने प्रभावित

पाथर्डीत सर्वाधिक टॅंकर सुरू राहाता, कोपरगाव व राहुरीत सर्वांत कमी टॅंकर

नगर: थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. पाण्याबरोबर चारा टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पाच तालुक्‍यातील चारा डिसेंबरलाच संपला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी तीन तालुक्‍यात चारा टंचाईची समस्या उभी राहणार आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना कागदोपत्री तयार आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी दुष्काळाच्या अगोदर का होत नाही, असा प्रश्‍नही आहे. जिल्ह्यातील 305 गावे आणि दीड हजार वाड्यांवरील सुमारे 6 लाख 73 जार 530 लोकांना सुमारे 371 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील ही परिस्थिती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उग्र रूप धारण करेल, असा अंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी सुमारे 67 कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र 9 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. थंडीची काहीशी तीव्रता कायम आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ अजून जाणवत नाही. फेब्रुवारीपासून दुष्काळाची तीव्रता अधिक होणार आहे. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे चारा छावण्यांच्या मागणीचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमधील चारा संपला आहे. तीन तालुक्‍यातील चारा जानेवारीच्या मध्यावरच संपला आहे. भूगर्भातील पाणी पातळीने तळ गाठला आहे. जिल्ह्यातील सुमारे 513 गावे ही अतिविकसितमध्ये (ड्राकझोन) आले आहेत. भूजल आयोगाकडे हा अहवाल सादर देखील झाला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हा अहवाल मात्र फेटाळून लावला आहे. भूजल विकास आणि सर्वेक्षण विकास यंत्रणेची भूगर्भातील पाणी मोजणीची पद्धत “आऊट डेटेड’ आहे, असे पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी म्हटले आहे. असे असले तरी दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यात सुरू असलेले टॅंकर सांगते.

पाथर्डी तालुक्‍यातील सर्वाधिक 119 टॅंकर सुरू आहे. तेथील 90 गावांमध्ये आणि 534 वाड्यांवरील सुमारे 2 लाख 31 हजार 854 लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संगमनेरमधील 41 गावे आणि 152 वाड्यांवरील 70 हजार लोकांना 35 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोपरगाव मधील दोन गावे आणि 10 वाड्यांवरील साडेतीन हजार लोकांना दोन टॅंकरद्वारे व राहुरीतील दोन गावांमधील पाचशे लोकांना एक टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. राहाता तालुक्‍यातील एक गाव आणि 19 वाड्यांवरील साडेसहा हजार लोकांना तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नगर तालुक्‍यातील 26 गावे आणि 105 वाड्यांवरील 37 हजारा लोकांना 28 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. पारनेरमधील 45 गावे आणि 288 वाड्यांवरील एक लाख लोकांना 58 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शेगवामधील 28 गावे आणि 86 वाड्यांवरील 80 हजार लोकांना 33 टॅंकरद्वारे, तर कर्जतमधील 35 गावे आणि 189 वाड्यांवरील 61 हजार लोकांना 39 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जामखेडमधील 22 गावे आणि 20 वाड्यांवरील 37 हजार लोकांना 22 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. श्रीगोंद्यातील 12 गावे आणि 109 वाड्यांवरील 25 हजार लोकांना 15 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पारनेर येथील नगर पंचायत हद्दीतील एक गाव आणि 35 वाड्यांवरील 16 हजार लोकांना 16 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.


दक्षिणेकडून चारा छावण्यांची मागणी

नगर दक्षिण भागाला सर्वाधिक दुष्काळाची झळ बसू लागली आहे. पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे, पारनेर आणि संगमनेर तालुक्‍यातून चारा छावण्यांची मागणी होत आहे. बाजार समितींचे पत्र देखील जिल्हा टंचाई शाखेकडे आले आहेत. सरकारचा अध्यादेश येताच यावर कारवाई सुरू केली जाईल, असे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी सांगितले.


जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रतिबंध

जिल्ह्यात पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातून चारा वाहतुकीस प्रतिबंध आहे. आदेशामुळे जिल्ह्याबाहेर चारा न जाता जिल्ह्यातील जनावरांसाठी उपलब्ध होणार आहे.


जिल्ह्यात 371 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

दुष्काळाने जिल्ह्यातील सुमारे 305 गावे आणि 1 हजार 547 वाड्यांवरील सुमारे 6 लाख 73 हजार लोक प्रभावित झाले आहे. या लोकांना 371 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यातील ही परिस्थिती फेब्रुवारीपासून उग्र रूप धारण करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)