नगर अर्बन बॅंक उतरणार नॉन बॅंकिंग व्यवसायात

खा. गांधी यांची माहिती; अहमदाबादच्या बॅंकेचे विलीनीकरणही

प्रभात वृत्तसेवा
नगर – नगर अर्बन बॅंक आता नॉन बॅंकिंग व्यवसायात उतरणार आहे, अशी माहिती खा. दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगर अर्बन बॅंक आवश्‍यकतेपेक्षा चौपट क्षमतेचे डाटा सेंटर उभे केले असून पतसंस्थांसह अन्य अनेक संस्थांना या डाटा सेंटरचा उपयोग करून घेता येईल, अशी माहिती त्यांनी दिली. अहमदाबादच्या नफा असलेल्या बॅंकेचे नगर अर्बन बॅंकेत विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे सांगताना त्यांनी तिचे नाव सांगायला नकार दिला.
या बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 27 तारखेला असून बॅंकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देण्यासाठी खा. गांधी यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. त्या वेळी ते म्हणाले, की नगर अर्बन बॅंकेने केडगाव येथे मोठे डाटा सेंटर उभे केले आहे. त्याची इमारत तयार झाली आहे. बॅंक स्वतःची कंपनी स्थापन करून सारस्वत, कॉसमॉस बॅंकेसारखी नॉन बॅंकिंग व्यवसाय सुरू करणार आहे. बॅंकांच्या सर्व कार्यालयात सर्व प्रकारची बिल भरण्याची व्यवस्था करणार आहे. इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग आदी सुविधा सुरू करणार आहोत. बॅंकेच्या सभासदांसाठी एक जानेवारीपासून पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या उपचारासाठीची विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. एक हजार रुपयांचे शेअर्स आणि तीन हजार रुपयांची बचत खात्यात शिल्लक या दोनच अटींवर सभासद विमा लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर अर्बन बॅंकेच्या अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) गेल्या आर्थिक वर्षात 21 टक्के झाले आहे. त्यामुळे बॅंकेला ऑडिटमध्ये ब वर्ग मिळाल्याचे खा. गांधी यांनी अन्य एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. आष्टी तालुक्‍यातील धामणगाव येथे एटीएम सुरू करण्यात आले असून श्रीरामपूर, चंदननगर, संगमनेर, पिंपरी आणि पुण्यातील सदाशिव पेठेत एटीएम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नगर जिल्ह्यातील चार नागरी बॅंकांचे नगर अर्बन बॅंकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव होता; परंतु या बॅंकेची सूत्रे ज्यांच्या हाती होती, त्या सहायक निबंधकांनी सहकार्य केले नाही, त्यांची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप खा. गांधी यांनी केला. बॅंकेला 11 कोटी नऊ लाख रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी मागितली आहे.
बॅंकेच्या ठेवी 1255 कोटी रुपयांच्या आहेत. या आर्थिक वर्षात 95 कोटी रुपयांनी ठेवी वाढविण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे, असे सांगून खा. गांधी म्हणाले, की सध्या आठशे कोटी रुपयांचे कर्ज वितरण आहे. ते साडेआठशे कोटी रुपयांचे करून एकूण व्यवसाय 2200 कोटी रुपयांचे करण्याचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच इंस्ट्रा कार्ड सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ग्राहकांना ऑनलाईन पैसे हस्तांतरणासाठी आयएमपीएस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार व बॅंकर्स म्हणून वेगवेगळ्या भूमिका

नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयाचा बॅंकिंग व्यवसायावर तसेच उद्योगावर झालेल्या परिणामांची अहवालात दिलेली माहिती आणि नोटाबंदीचे सरकारने केलेले समर्थन याबाबत खा. गांधी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, की देशात व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना नोटाबंदी व जीएसटीचा फटका बसला, अशी चर्चा होती. सर्वंच बॅंकांनी त्याचा उल्लेख अहवालात केला आहे. त्यामुळे तसाच उल्लेख आपणही केला. त्यात वेगळे काही नाही. नोटाबंदी व जीएसटीचा फायदा काळ्या पैशाला आळा घालण्यात झाला. दहशतवाद्यांची रसद थांबली. देशाचे उत्पन्न वाढले. नोटाबंदीच्या काळात नगर अर्बन बॅंकेचे दोनशे कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले, असे आपण म्हणालो होतो, असे सांगताना त्यांनी बॅंकर्स आणि खासदार म्हणून दोन वेगवेगळ्या भूमिका सांगितल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)