नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह गटनेत्यांना भाजपने घरचा रस्ता दाखवावा

  • लोणावळा नगरपरिषद : बंडखोर नगरसेवकांची मागणी

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेमधील भाजपच्या लोकनियुक्‍त नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि गटनेते देवीदास कडू या तिघांना पक्षातून कायमचे काढून टाकावी, अशी मागणी नगरपरिषदेच्या विषय समिती निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केली.

काही दिवसांपूर्वी लोणावळा नगरपरिषद विषय समिती निवडणुकीत भाजपच्या गौरी मावकर यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले. तसेच भरत हरपुडे आणि जयश्री आहेर यांनी मतदानाला अनुपस्थित राहत अप्रत्यक्ष रित्या विरोधी गटाला मदत केली होती. यामुळे नगरपरिषदेच्या विषय समिती निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस आणि आरपीआय या सत्ताधारी आघाडीला पाणीपुरवठा, बांधकाम आणि आरोग्य सारख्या तीन महत्त्वाच्या समित्या गमवाव्या लागल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर एका पत्रकार परिषदेद्वारे नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि गटनेते देविदास कडू यांनी शहरप्रमुख रामविलास खंडेलवाल यांच्या उपस्थितीत वरील तीनही नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करीत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती दिली होती.

यावर गौरी मावकर, भरत हरपुडे आणि जयश्री आहेर यांनी देखील पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर दिले. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि गटनेते हे सातत्याने आम्हा तिघांना दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक देत आले आहेत. पार्टी मिटिंग न घेता, एकत्रित चर्चा विनिमय न करता स्वतःची मनमानी करीत स्वहित साधण्याच्या दृष्टीने कायम आमचा उपयोग करून घेत आले असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत या त्रयींनी केला.

आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे हे कोणत्याही गटात नसताना, काहीही माहिती न देता अचानक त्यांचे नाव सभापती पदासाठी पुढे आणले गेले. त्यामुळे त्यांच्या पराभवाशी आमचा काहीही संबंध नसून, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि गटनेते यांनीच दामोदरे यांची फसवणूक केली असल्याचे हरपुडे, मावकर आणि आहेर यांनी सांगितले. तसेच भविष्यात सभागृहात चांगले निर्णय आणि विकास कामाच्या संदर्भात आम्ही पक्षासोबतच राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.