“नगरसेवक हरवले आहेत’ बॅनरबाजी झोंबली

महापालिका मुख्यसभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवर


हरिदास चरवड यांचा सत्ताधाऱ्यांनाच “घरचा आहेर’

पुणे – अनेकदा तक्रार करूनही नागरिकांची कामे होत नसल्याने “नगरसेवक हरवले आहेत’ अशी धायरीतील प्रभाग 33 या वडगाव बुद्रुक परिसरात करण्यात आलेली बॅनरबाजी स्थानिक नगरसेवकांना चांगलीच झोंबली. ती सगळी आगपाखड स्थानिक नगरसेवकांनी मंगळवारी मुख्यसभेत करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

“सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी, रस्त्याची दूरवस्था, पीएमपीएमएलचा डेपो या सगळ्याबाबत अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे ऐकली, तर हे अधिकारी या पदावर काम करण्याला पात्र आहेत का,’ असा प्रश्‍न हरिदास चरवड यांनी मुख्यसभेत विचारला. एवढेच नव्हे, तर “अन्य ठिकाणी अधिकारी कामे करतात परंतु आम्ही हजारदा तक्रार करूनही दुर्लक्ष करतात. पैसे घेऊनच हे अधिकारी काम करतात का,’ असाही प्रश्‍न उपस्थित करून सत्ता असतानाही काम करून घेता येत नसल्याने पक्षाला घरचा आहेर दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आम्ही रात्रंदिवस काम करूनही जर अशाप्रकारे बॅनरबाजी होत आहे’ असे सांगत चरवड यांनी नाराजी व्यक्त केली. “अधिकारी काम करत नाहीत. समाविष्ट गावातील रस्त्यांचा प्रश्‍न अतिशय बिकट असून, संबंधित खात्याचे अधिकारी झोपा काढतात का,’ असा थेट सवाल राजाभाऊ लायगुडे यांनी उपस्थित केला. “जागेवर व्हिजीट करायला आल्यानंतर स्थानिक नगरसेवकांनाही त्याची कल्पना दिली जात नाही’ लायगुडे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच “100 वेळा फोन केल्यानंतर उचलले जात नाहीत,’ अशी तक्रारही लायगुडे यांनी केली.

कामे तातडीने मार्गी लावा : महापौर
अधिकारी सदस्यांचे ऐकत नाहीत अशी ओरड सत्ताधारी पक्षातीलच नगरसेवकांनी करत मागील मुख्यसभेत प्रशासनावर ताशेरे ओढले होते. अधिकारी मुजोर आहेत इथपर्यंत नगरसेवकांनी आरोप केले होते. मात्र मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत महापौरांनीच प्रत्येक नगरसेवकाच्या तक्रारीवर प्रशासनाला प्रश्‍न सोडवण्यासंदर्भात आदेश देण्याला सुरूवात केली. रस्त्यांची तक्रार केलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात त्यांच्याशी वेळेबाबत समन्वय करून व्हिजीट देण्याचे आदेश दिले. जयंत भावे यांनीही भूसंपादनाबाबत एक तक्रार केली. तर, महापौर कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना बोलावून हा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

समाविष्ट गावांतील रस्ते करण्यासाठी तरतूद नाही. येथे खड्डे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कारण, या रस्त्याचे “बेसवर्क’च झाले नाही. ते करण्यासाठी तरतूद उपलब्ध नाही. त्यामुळे या रस्त्यांवर सध्या मुरूम टाकण्यात आला आहे. या भागात दोनदा भेट दिली आहे.
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, मनपा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)