नगरसेवक मयूर कलाटेंचे मानधन संरक्षण सहाय्यता निधीला

पिंपरी – पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांच्या कुटुंबियांना मदत व्हावी, याकरिता राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे आपले 1 मार्च 2019 ते फेब्रुवारी 2022 पर्यंतचे मानधन केंद्र संरक्षण सहाय्यता निधीला देणार आहेत. नगरसेवकपदाचे दरमहा असलेले 15 हजार रुपये मानधन केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस देण्यात यावे, असे पत्र कलाटे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर व नगरसचिव उल्हास जगताप यांना दिले आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले. या जवानांच्या कुटुंबियांना केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. मात्र कुटुंबातील कर्ता माणूस गमावल्यानंतर आर्थिक दृष्टया ते कुटुंब अडचणीत येते. काही दिवसांनी आपण त्या कुटुंबाला विसरुन जातो. अनेकदा शहिदांच्या कुटुंबियांना फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागते. त्यांच्या मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे आजारपण इत्यादी गोष्टींना त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नाही. देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना थोडीफार आर्थिक मदत व्हावी, यासाठी नगरसेवकपदाचा कालावधी फेब्रुवारी 2022 संपेपर्यंतचे मानधन केंद्र सरकारच्या संरक्षण सहाय्यता निधीस ( नॅशनल डिफेन्स फंड) देण्यात यावे, असे कलाटे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.