नगरसेवक प्रवेशासाठी भाजपकडून आमिषांची खैरात

निवडणूक खर्चाची हमी; पक्षाच्या सर्वेक्षणाचा दाखला
प्रभात वृत्तसेवा
नगर- महापालिका निवडणुकीची तयारी आता सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्या दृष्टीने सर्व पक्ष तर्कविर्तकांची विचार करून व्यूहरचना करीत आहेत. त्यात भाजप सध्या आघाडीवर आहे. जळगाव व सांगली महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आल्याने नगरमध्येदेखील तो इतिहास घडणार, अशा आवेशात असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अन्य पक्षांच्या मातब्बर नगरसेवकांना लक्ष्य केले असून त्यांना “भाजपवासी’ करण्यासाठी वेगवेगळ्या आमिषांची खैरात केली जात आहे. त्यामुळे नगरसेवक भाजपच्या गळाला लागत आहेत.
महापालिका निवडणूक सर्वंच राजकीय पक्षांनी आता प्रतिष्ठेची केली आहे. जळगाव व सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे स्थानिक नेते चांगलेच हुरळून गेले आहेत. अन्य पक्षांनी आतापासून नगर महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार लवकरच जाहीर करण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणासह प्रभागरचना जाहीर झाली आहे. प्रभागाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली आहे. हक्‍काचे मतदार अन्य प्रभागात गेल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करून प्रभागाचा सर्व्हे सुरू केला आहे.
या निवडणुकीत भाजप व शिवसेना अशी महत्वपूर्ण लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील आपल्या परीने या निवडणुकीचे नियोजन करीत असली, तरी आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या भोवती सर्व निर्णय प्रक्रिया राहणार असल्याने पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून फारसा हस्तक्षेप होणार नाही; मात्र भाजप व शिवसेना सत्तेचा पुरेपूर फायदा घेऊन आपली यंत्रणा उभी करीत आहे. त्यात भाजप आघाडीवर असून निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांना भाजपवासी करण्यासाठी जाळे टाकले आहे. या जाळ्यात नगरसेवकांना अडकविण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. त्यासाठी निवडणूक खर्चाची हमी घेतली जात असून सुरुवातीलाच काही रक्‍कम टोकन म्हणून देण्याची तयारी दर्शविण्यात येत आहे. डोळ्यासमोर लाखांचे आकडे उभे केले जात आहेत. त्यामुळे डोळे फिरणारच अशी अवस्था विद्यमान नगरसेवकांची झाली आहे. त्यात पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या चिन्हावर विजयाची खात्री असल्याचे दर्शविण्यात येत आहे. अर्थात हे सर्वेक्षण कोणी केले, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. नगगरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजपकडून खास पदाधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आश्‍वासनासह आमिषांची खैरात केली जात आहे. अर्थात या प्रक्रियेत दुसरा गट अद्यापही बाजूला आहे. एकाच गटाकडून महापालिका निवडणुकीची आखणी केली जात आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दोन्ही गटांनी एकत्रितपणे काम करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. या निवडणुकीत गटबाजी करू नका, असे बजावले आहे, तरीही दुसरा गट अद्याप सक्रिय झाला नाही. या सर्व प्रकारामुळे आमिषे दाखविणाऱ्या गटाच्या विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)