नगरसेवकांना हा अधिकार कोणी दिला?

पिंपरी-चिंचवड वर्तमान
निशा पिसे

आकुर्डी परिसरात होणाऱ्या विस्कळीत पाणी पुरवठ्याप्रकरणी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याच्या तोंडाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाने काळे फासण्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण करुन सोशल मीडियावर तो पसरवण्यात आला. त्यामुळे गुन्हेगारी कारवायांमुळे गेली अनेक महिने अज्ञातवासात गेलेले हे नगरसेवक महोदय अचानक प्रसिध्दी झोतात आले. लोकप्रतिनिधींची प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी नवखा प्रकार नाही. मात्र, ही “स्टंटबाजी’ महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र, हे आंदोलनही लोकशाहीच्या चौकटीतच असायला हवे. कारण दुसऱ्याला काळे फासताना आधी स्वतःच्या हातांना काळे फासावे लागते, हे विसरुन चालणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झुंडशाहीला वैतागून पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपला प्रथमच महापालिकेत संधी दिली. सत्तेवरुन पाय उतार झाल्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील झुंडशाही कायम असल्याचे दर्शन तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या एका अभियंत्याला अनुभवायला मिळाले. पाणी प्रश्‍नी बैठकीसाठी बोलावून चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाने चोर पावलाने येत संबंधित अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर या अभियंत्याला अर्धातास बसवून ठेवण्यात आले. यावेळी उपस्थित संबंधित नगरसेवकांच्या समर्थकांनी या अभियंत्याला शिव्यांची यथेच्छ लाखोली वाहिली. हा प्रकार घडत असताना नगरसेवकाच्या समर्थकांनी त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवत नगरसेवकाला या कामगिरीबद्दल चक्क हिरो ठरवले. एखाद्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याची ही कुठली पध्दत असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.

या प्रकरणाचे तीव्र पडसाद महापालिका वर्तुळात उमटले आहेत. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निषेध सभा घेतली. एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. प्रभागातील विकास कामासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्याने माझ्याकडे सर्वात प्रथम आले पाहिजे, अशी प्रत्येक नगरसेवकाची मानसिकता होत आहे. आपले राजकीय सामर्थ्य दाखविण्यासाठी या नगरसेवकांकडून उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना अनेकदा शिविगाळ केली जाते. मात्र, नोकरीच्या भीतीने हे अधिकारी व कर्मचारी गप्प बसतात. परिणामी अशा घटनांमुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. हे कर्मचारी महापालिकेचे वेतन घेतात. ते कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नोकर नाहीत. कर्मचाऱ्यांचा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. तो कोणत्याही लोकप्रतिनिधीने दुखावू नये. एखादा अधिकारी अथवा कर्मचारी कामात चुकत असेल तर त्याची महापालिका प्रशासनाकडे जरुर तक्रार करा. प्रशासन त्याला शिक्षा देईल. मात्र, चुकी नसताना एखाद्या अभियंत्याच्या तोंडाला काळे फासून, त्याला अर्धा तास बसवून ठेवण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना कोणी दिला? असा आर्त सवाल करत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्यथा या सभेत मांडण्यात आल्या.

आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असताना आपले अपयश झाकण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांच्या डोक्‍यावर खापर फोडण्याची खेळी सर्वसामान्य करदात्यांच्या पचनी पडणारी नाही. विशेष म्हणजे अभियंत्याच्या तोंडाला काळे फासणाऱ्या या नगरसेवकावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. क्रिकेटचा सट्टा लावताना या नगरसेवकाला गतवर्षी अटक झाली होती. त्यानंतर हे महोदय अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर अचानकपणे अभियंत्याला काळे फासल्याच्या घटनेनंतर प्रकाशझोतात आले. कदाचित त्यांनी अज्ञातवासातील काळ आत्मचिंतनात घालवला असावा. त्यानंतर ते जनतेच्या प्रश्‍नावर आक्रमक झाले असावेत, असे म्हटले तरी एखाद्याच्या तोंडाला काळे फासून कुठला प्रश्‍न सोडवता येतो? आणि असेच असते तर महात्मा गांधींपासून ते समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापर्यंत प्रत्येकाने हा मार्ग अवलंबला असता. उपोषण करुन स्वतःचा देह झिजवण्यात काय अर्थ?. झुंडशाहीच्या मार्गाने कोणताही प्रश्‍न सुटत नाही उलट तो चिघळतो. प्रसिध्दीच्या “स्टंटबाजी’साठी सुरु असलेल्या झुंडशाहीला कुठेतरी लगाम घालण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)