नको धनदान, हवे फक्त श्रमदान…

   कथाबोध

डॉ. न. म. जोशी

वर्ध्याजवळ महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. सेवाग्राम ते वर्धा हा रस्ता अत्यंत खराब होता. सेवाग्रामकडे येण्यासाठी तेवढाच रस्ता होता. ओबडधोबड रस्ता, ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे, खाचखळगे होते. या रस्त्यावरून चालताना खूपच त्रास होत असे. गांधीजींच्या आश्रमवासीयांनी आणि इतर लोकांनीही गांधीजींना याबाबत तक्रारीच्या सुरात सांगितलं. म. गांधी हसून म्हणाले.
“चला, आपण सगळे मिळून हा रस्ता दुरूस्त करूया.’
“अहो, पण सरकारी खात्याला कळवलं तर बांधकाम खात्याकडून रस्ता दुरूस्त केला जाईल. अगदी सोपं आणि सहज काम आहे. तुमची चिठ्ठी जायचा अवकाश.’
“हो पण अशी चिठ्ठी मी सरकारला लिहिणार नाही. आपण श्रमदानानंच रस्ता तयार करायचा. त्यासाठी आपण कष्ट करायचे. प्रत्येकानं हातभार लावायचा.’
“काय करायचं प्रत्येकानं?’
“अगदी सोपं काम आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकानं फक्त दोन दगड किंवा दोन ओंजळी मुरुम-माती येताना आणायाची आणि या खड्ड्यांमधून टाकायची आणि खड्डे भरायचे. ते भरले की त्यावर पाणी टाकून चोपून बसविण्याचीही व्यवस्था करता येईल.’
गांधीजींच्या सांगण्याप्रमाणे लोक येता जाता श्रमदान करू लागले. खड्डे भरू लागले. एक दिवस वर्ध्याचे एक श्रीमंत गृहस्थ, त्यांना चांदीवाले म्हणत, गांधीजींच्या भेटीसाठी आले. त्यांची श्रीमंती त्यांच्या शरीरावरही दिसत होती. ते तुंदिलतनु होते ते घामाघूम झाले होते. आश्रमात आल्यावर ते गांधीजींना म्हणाले,
“महात्माजी आश्रमाकडं येण्याचा रस्ता खराब आहे. तुम्ही मला आज्ञा कराल तर मी हवे तेवढे पैसे देतो. हा रस्ता दुरूस्त करून घ्या. येताजाता लोक तिथं दगडमाती मुरुम टाकत आहेत. मी बघतोय. पण असं काम कसं होणार?’
“चांदीवालेजी, तुम्ही धनदान करण्याची इच्छा व्यक्त केलीत चांगली गोष्ट आहे.’
“मग कितीचा चेक पाठवू?’
“नको मला धनदान नको. तुमच्याकडून आणखी काही हवं आहे.’
“आणखी काय हवं?’
“श्रमदान. मी धनदानापेक्षा श्रमदानाला जास्त महत्त्व देतो. तुम्ही श्रमदान केलंत तर दोन गोष्टी साध्य होतील.’
“कोणत्या दोन गोष्टी?’
“रस्ता दुरूस्तीच्या कामाला तुमचा हातभार लागेल… पहिली गोष्ट.’
“दुसरी गोष्ट कोणती?’
“श्रमदानामुळे तुमचं पोटही थोडं आत जाईल. तुंदिलतनु आहात, आपोआप व्यायाम होईल.’
चांदीवाले यांनी लगेच फावडं हाती घेतलं.
   

      कथाबोध

श्रमाचं महत्त्व अनेकांना समजलेलंच नसतं पैशाच्या जोरावर इतरांचे श्रम विकत घेऊन स्वतःची चरबी वाढवणारे अनेकजण या समाजात आहेत. श्रम हे श्रमासाठीच करायचं नसतात तर शरीर स्वास्थ्यासाठीही त्याचा उपयोग होतो. समाजस्वास्थ्य सुधारण्यासाठी तर श्रमांचा उपयोग होतोच होतो.असं आहे श्रमांचं महत्त्व!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)