नऊ सराईत गुन्हेगारांकडून 14 लाखांचा ऐवज जप्त

– 15 गुन्हे उघडकीस : पिंपरी पोलिसांची कारवाई

पिपरी – पिंपरी पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत नऊ सराईत आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 लाख 7 हजार 725 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या सराईतांकडून पिंपरी पोलीस ठाण्यातील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. बिराजदार नगर, हडपसर), हर्षल गुलाब पवार (रा. कुळे, ता. मुळशी), महेश शिवदास दिक्‍से (वय 28, रा. लोणी, ता. रिसोड, जि. वाशीम), सॅम्युअल उर्फ विशाल डेडली ऑरनॉल्ड (वय 30, रा. संभाजीराव हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), अतुल अविनाश पवार (वय 25, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), सागर कुमार इंद्रा (वय 25, रा. कैलासनगर, बालाजी कॉलनी, थेरगाव, काळेवाडी), राहुल श्रीहरी काळे (वय 34, रा. बुधवार पेठ, पुणे), अक्षय आबासाहेब कोळेकर (वय 19, रा. साने कॉलनी, साने चौक, मोरेवस्ती, चिखली), शुभम नितीन काळभोर (वय 19, भीमशक्ती नगर, स्पाईन रोड झोपडपट्टी, मोरेवस्ती चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

क्षेत्रवन अपार्टमेंटमध्ये काही इसम घुसले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्याठिकाणाहून सुरजितसिंग टाक याला ताब्यात घेतले. अन्य तिघे पळून गेले. सुरजितसिंगकडे कसून चौकशी केली असता पिंपरी पोलीस ठाण्यातील पाच, हडपसर पोलीस ठाण्यातील एक आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून तीन लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन सॅन्ट्रो कार, 79 हजार 225 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख 44 हजार 225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात सराईत गुन्हेगार हर्षल पवार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन लाख 46 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

मिलिंदनगर पिंपरी स्विफ्ट डिझायर (एम एच 12 / पी क्‍यू 6201) कारमधून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या सॅम्युअल, अतुल आणि सागर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी कोयता, एक सुरा व एक स्विफ्ट डिझायर असा एकूण तीन लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पिंपरी कॅम्प मधील एका मोबाईल दुकानातून महेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 89 हजार रुपये किमतीचा एक ऍपल कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्याच दिवशी राहुल याला चिंचवड मधील सायन्स पार्कच्या कंपाउंडजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा माल जप्त करण्यात आला. वरील दोन्ही प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.मोहननगर येथुन दुचाकीवरुन जाणाऱ्या अक्षय यांच्याकडे विचारपूस केली असता, त्याच्याकडे चोरीचे पाच मोबाईल फोन आढळून आले.

त्याच्याकडून दुचाकी आणि मोबाईलफोन असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे शुभम संशयितरित्या उभा असलेला आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 16 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कारवाईत 11 तोळे 3 ग्रॅम सोने-चांदीचे दागिने 23 मोबाईल फोन, 3 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 2 सेन्ट्रो कार, 1 स्विफ्ट कार, 1 करिझमा मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 14 लाख 7 हजार 725 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, हरिदास बोचरे, महिला पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला सावंत यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)