ध्येयवादाशिवाय जीवनात यश कठीण – डॉ. प्रमोद बोराडे

सांगवी – शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे स्वप्न आधुनिक पिढीने लक्षात घेवून जीवनात स्वत:चे स्वप्न ठरविणे आवश्‍यक आहे. कोणत्याही ध्येयवाद ठेवल्या शिवाय जीवनात यशस्वी होणे कठीण आहे. यशस्वी होण्यासाठी आधी स्वप्न पहा, असे आवाहन इतिहास संशोधक व गड किल्ल्यांचे अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले.

हिंजवडी येथील अकेमी बिझनेस स्कुलमध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून डॉ. प्रमोद बोराडे यांचे शिवचरित्र विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची भाषणे, पोवाडे आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अभिषेक बोके, अध्यक्षा विभा बोके, प्रा. मिनू तिवारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

डॉ. बोराडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवनात अग्रक्रम दिल्यास नक्की यशस्वी व्हाल. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिवरायांचे विचार प्रेरणादायी ठरतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमके काय करायचे हे ठरवून कष्ट घेतले, तर यश हमखास मिळेल. आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते खूप विचार करून निवडले पाहिजे. मेहनतीसोबतच धाडस, निर्व्यसन, शुद्ध चारित्र्य या गोष्टींनाही तेवढेच महत्त्व द्यावे. सर्वच थोडे थोडे करण्यापेक्षा एकाच विषयात सखोल संशोधन केल्याने यशप्राप्ती होते. तुमच्या यशाचे आई-वडिलांनी तोंडभरून कौतुक करण्याएवढी जगात दुसरी कोणतीच गोष्ट नाही, असेही डॉ. बोराडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.