धुलिवंदनाचा बेरंग; मद्यपी चालकांवर धडक कारवाई

पुणे – धुलिवंदनाचे निमित्त साधून वाहतुकीचे नियम मोडत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्यांवर पुणे शहर वाहतूक शाखेने जोरदार कारवाई केली आहे. गुरूवारी दिवसभरात “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’अंतर्गत 184, तर विरुद्ध दिशेने वाहन पळविल्याप्रकरणी 40 जणांवर कारवाई केली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

धुलिवंदनाच्या दिवशी अनेक जण मद्य प्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता असते. अपघात तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमम यांनी वाहतूक पोलीस तसेच विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. टोळक्‍याकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकात वाहतूक शाखेतर्फे नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच, बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांनी वाहनचालकांची “ब्रेथ ऍनालायझर’द्वारे तपासणी केली. यावेळी रस्त्यावर समुहाने वेगाने दुचाकी पळविणे, मद्यप्राशन करून तसेच विरुद्ध दिशेने “नो एन्ट्री’तून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आर्थिक दंड वसूल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.