धर्मसत्ताविरुद्ध राजसत्ता (अग्रलेख)

भगवानबाबांनी कधीही जातीयतेला थारा दिला नाही; परंतु आता भगवानगड फक्‍त वंजारी समाजापुरता मर्यादित झाला असेल तर त्यातून गडाचेच नुकसान होणार आहे. संत भगवानबाबांच्या 122 व्या जयंतीचे निमित्त साधत भगवानसेनेने भगवानगडावर वंजारी समाजाच्या आरक्षण व आंदोलनासंदर्भात बोलाविलेली बैठक गडाची शांतता भंग करण्याच्या दृष्टीने केलेले कारस्थान आहे, हा नामदेव शास्त्रींचा आरोप गांभीर्याने घेण्यासारखा आहे. 
धर्मसत्ता व राजसत्तेत संघर्ष निर्माण झाला, की त्याचे परिणाम समाजालाही भोगावे लागतात. खरे तर या दोन्ही सत्तांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी असतात. त्यांनी एकमेकांच्या कामात ढवळाढवळ केली, तरच संघर्ष निर्माण होतो. दोन्ही विभागांनी आपापल्या क्षेत्रात काम केले, तर एकमेकांच्या मर्यादा सांभाळल्या, तर संघर्ष होण्याची शक्‍यता नसते; परंतु धर्मसत्ता तिची मर्यादा ओलांडायला लागली आहे, तर राजसत्ता धर्मसत्तेच्या कारभारात नाक खुपसायला लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून नगर जिल्ह्यातील भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराज व राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्यात जो सुप्त संघर्ष सुरू आहे, त्याचे कारण दोघांचाही मर्यादाभंग हेच आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी डॉ. शास्त्री व मुंडे यांच्यातील वादावर पडदा पडला होता; परंतु आता त्यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पंकजा मुंडे आणि महंत बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील तागडगाव येथे नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले होते. संत भगवानबाबांनी आपल्याला वैभवशाली परंपरा दिली असून समाज एकसंध राहायला पाहिजे, धर्माचे क्षेत्र हे धार्मिक कार्यक्रमांसाठीच असायला हवे, असे पंकजा यांनी त्या वेळी सांगितले होते; परंतु आता पंकजा यांचे समर्थक फुलचंद कराड यांनी वंजारी समाजाचा मेळावा भगवानगडावर घेण्याचे जाहीर करून पंकजा यांच्या यापूर्वीच्या म्हणण्यालाच छेद देण्याचे ठरविले आहे.
गोपीनाथ मुंडे यांनीच डॉ. शास्त्री यांची भगवानगडाचे महंत म्हणून नेमणूक करण्यात पुढाकार घेतला. गोपीनाथरावांनी दसरा मेळाव्याचा वापर राजकीय दिशा देण्यासाठी केला, संत भगवानबाबा हे वंजारी समाजाचे दैवत असल्याने या मेळाव्यातही वंजारी समाजच प्रामुख्याने उपस्थित असायचा. त्या वेळी डॉ. शास्त्री यांनी दसरा मेळाव्याला हरकत घेतली नाही आणि आताच ती ते का घेत आहेत, असा प्रश्‍न तार्किकदृष्ट्या योग्य आहे; परंतु पूर्वी धार्मिक स्थळावर राजकीय मेळावे घ्यायला परवानगी दिली, ती चूक होती, असे मान्य करून डॉ. शास्त्री आता ती सुधारायचा प्रयत्न करीत असतील, तर पंकजा यांच्यासह सर्वांनी तिचे स्वागत करायला हवे. ते राहिले बाजूला मुंडे समर्थकांनी मागे नामदेवशास्त्रींच्या सुपारीची भाषा वापरली होती. त्यातून वादाची दरी आणखी रुंदावली होती.
भगवानगडावर राजकीय मेळावा घ्यायला महंताचा विरोध होता, दर्शन घ्यायला नव्हता, हे लक्षात घेतले पाहिजे. गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यायलाही त्यांनी विरोध केला नाही. भगवानगडावर कोणत्याही परिस्थितीत राजकीय भाषण होऊ देणार नाही, गडाचे पावित्र्य कायम ठेवू, असा आक्रमक पवित्रा नामदेव शास्त्रींनी घेतला होता, तर पंकजा यांनीही विजयादशमीच्या दिवशीची भाषणाची परंपरा कायमच ठेवूच, असे जाहीर करून तशी तयारीही केली होती. अखेर त्यांना दोन पावले मागे घेत पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला. आपण गडावर राजकीय भाषण करणार नाही, अशी ग्वाही पंकजा यांनी देऊनही, नामदेव शास्त्रींनी तडजोड स्वीकारली नाही, हा त्यांचाही आढ्यताखोरपणाच होता.
वंजारी समाजाला गोपीनाथ मुंडे यांनीच नेतृत्व दिले होते. त्यांच्या निधनाने सैरभैर झालेल्या समाजाने पंकजा यांचे नेतृत्व स्वीकारले; पण वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाच्या महंतांनी मात्र ते स्वीकारले नाही. संत भगवान महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचा हक्क कुणालाही नाकारता येणार नाही; परंतु डॉ. शास्त्री यांचे वागणे बारामतीकरांच्या इशाऱ्याने सुरू असल्याचा समज पंकजा आणि त्यांच्या समर्थकांचा आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात महादेव जानकर यांनी तशीच भाषा वापरली होती. अर्थात धनंजय मुंडे यांनाही डॉ. शास्त्री यांनी राजकीय भाषण करू दिलेले नाही. भगवानगडावरून राजकीय भाषण बंद करण्याचा निर्णय घेताना डॉ. शास्त्री यांनी भक्त म्हणून गडावर कोणीही या, अशी भूमिका घेतली. ती पंकजा यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
आजवर गडावर माझे बाबा चालले, मी तर गडाची कन्या आहे आणि मलाच विरोध का, असा त्यांचा सवाल आहे. पंकजा व त्यांच्या समर्थकांची सुपारीची भाषा जशी चुकीची आहे, तशीच डॉ. शास्त्री यांची क्‍लिपमधील भाषा ही चुकीची आहे. भगवानबाबांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना धौम्यगडावर येण्याचे निमंत्रण दिले आणि भगवानबाबांचे कार्य पाहून चव्हाणांनी निमंत्रण स्वीकारले. यशवंतराव दीड किलोमीटर चालत गडावर गेले. कार्यक्रमात त्यांनी भगवानबाबांच्या कार्याचे कौतुक करतानाच त्यांच्या दूरदृष्टी आणि सामाजिक कार्यामुळे यापुढे धौम्यगड भगवानगड या नावाने ओळखला जाईल, असे भाकीत केले.
शास्त्रींचे पुढे काय करायचे ते पाहू अशी धमकीवजा ऑडिओ क्‍लिप उघड झाली, तर एखाद्याला फाडून खाण्याइतकी माझ्यात ताकद असल्याचे शास्त्री बोलल्याची दुसरी क्‍लीप समोर आली आहे. ही दोन्ही वक्‍तव्ये चांगल्या राजकीय नेत्याची आणि चांगल्या धर्माचार्यांची नाहीत. भगवानबाबांनी कधीही जातीयतेला थारा दिला नाही; परंतु आता भगवानगड फक्‍त वंजारी समाजापुरता मर्यादित झाला असेल तर त्यातून गडाचेच नुकसान होणार आहे. संत भगवानबाबांच्या 122 व्या जयंतीचे निमित्त साधत भगवानसेनेने भगवानगडावर वंजारी समाजाच्या आरक्षण व आंदोलनासंदर्भात बोलाविलेली बैठक गडाची शांतता भंग करण्याच्या दृष्टीने केलेले कारस्थान आहे, हा नामदेव शास्त्रींचा आरोप गांभीर्याने घेण्यासारखा आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)