धरणे भरली, आता नियोजनाची कसोटी!

– गणेश आंग्रे

पुणे – “नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी पाण्यावरून राजकारण रंगते. पाण्यावरून ग्रामीण व शहरी असा वाद निर्माण होतो. पुढीलवर्ष तर निवडणुकांचे आहे. त्यामुळे पाण्यावरून राजकारण पेटण्याची शक्‍यता आहे. यंदा मात्र पावसाने साथ दिल्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे भरली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली, तरी उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाने पाण्याचा प्राधान्यक्रम ठरविला आहेत. यामध्ये प्रथम पिण्यासाठी त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम ठरला आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच दौंड, इंदापूर आणि बारामती या तीन तालुक्‍यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते.

शहराला पिण्यासाठी आवश्‍यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे आगमन उशिरा होत असल्याचे दिसून येते. जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणात अपेक्षित असा पाणीसाठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जूनमध्येही पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहते.

साधारणपणे ऑक्‍टोबरमध्ये होत असलेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी वाटपावर चर्चा होते. दि. 15 ऑक्‍टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते. यामध्ये पुढील वर्षीच्या दि. 15 जुलैपर्यंतच पाणी वाटपाचे नियोजन होते. ग्रामीण भागाला पाणी सोडले, तर शहराचे पाणी पळविले असा आरोप केला जातो. शेती आणि पिण्यासाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येते. या बैठकीमध्ये पाणीवाटपावरून दरवर्षी ग्रामीण आणि शहरी असा वाद रंगतो.

पुढील वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मतदारांना खूष करण्यासाठी, तसेच “आम्हीच पाणी दिले’ याचा तोरा मिरविण्यासाठी पाण्यावरून राजकारण रंगले तर आश्‍चर्य वाटायला नको!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)