धन्वंतरी गुंडाळली!

 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच सेवानिवृत्तांनादेखील लागू असलेली धन्वंतरी स्वास्थ योजनेपोटी महापालिका प्रशासनाने चार वर्षांत 60 कोटी 91 लाख रुपये मोजले आहेत. ही आरोग्य योजना महागडी ठरल्याने कर्मचारी महासंघासोबत बोलणी करुन प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य वीमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव महापालिका महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बीले सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या योजनेअंतर्गत वाढीव खर्च होऊ लागल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय धोरणात बदल करण्यात आला. या नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली आहे. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच काही दिवसांपुर्वीच या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांनादेखील सामावून घेण्यात आले आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांनादेखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली आहे. ही संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे.

या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात आहे. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जाते. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षाखालील दोन पाल्यांना याचा लाभ घेता येत आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून त्या कर्मचाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. सेवानिवृत्तीनंतरही ही योजना चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हाभरातील 93 रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय विभागांतर्गत असलेल्या धन्वंतरी स्वास्थ योजना समितीच्या सभेत कर्मचाऱ्यांची बीले मंजुर अथवा नाकारण्यासाठी विषय येत असतात. त्यामध्ये वैद्यकीय उपचाराकरिता रुग्ण दाखल झाल्यानंतर पुढील 48 तासांत तशी माहिती संबंधित विभागाला देणे बंधनकारक आहे. तर पॅनेलवरील अनेक रुग्णालयांच्या वर्तणुकीमुळे काही रुग्णालयांना पॅनेलवरून कमी करण्यात आले आहे.

धन्वंतरीचा आर्थिक डोलारा वाढतच असल्याने ऑक्‍टोबर 2015 ते जानेवारी 2019 या चार वर्षांमध्ये 60 कोटी 93 लाख रुपये खर्च झाला आहे. या खर्चाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला आरोग्य वीमा योजनेसारखी पावले उचलावी लागली आहेत. कर्मचाऱ्यांसाठी वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजना लागू करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक बैठक झाली आहे. त्यानुसार या योजनेकरिता मेसर्स के.एम. दस्तूर रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. या एजंटची नेमणूक करण्यात आली आहे.

सहा हजार रुग्णालयांध्ये उपचार उपलब्ध
धन्वंतरी स्वास्थ योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्हाभरातील एकूण 93 रुग्णालयांची पॅनेलवर नियुक्‍ती करण्यात आली आहे. प्रस्तावित आरोग्य वीमा योजनेत महाराष्ट्रबरोबरच परराज्यातील अशा एकूण सहा हजार रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार घेणे शक्‍य होणार आहे. या योजनेअंतर्गत कर्मचारी व त्याच्या पात्र कुटंब सदस्यांना प्रतिवर्ष तीन लाख रुपयांचा वीमा उतरविण्यात येणार आहे. मात्र, आजारावरील उपचारांनुसार ही मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढविली जाणार आहे. याकरिता 10 कोटी निधी उपलब्ध असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.