धनाढ्य व्यक्‍तींना गंडा घालणारे बंटी-बबली जेरबंद

सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते मैत्री


आर्थिक अडचणीचा पाढा वाचून मिळवत सहानुभूती


प्रेमाचे चाळे करतानाचे करत होते चित्रीकरण


एकाकडून साडेसात लाख खंडणी उकळण्याचा प्रयत्न

पुणे – सोशल मीडियाच्या माध्यमातून धनाढ्य व्यक्‍तींना प्रेमात पाडून खंडणी उकळणाऱ्या कॉल गर्लसह तिच्या प्रियकराला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. ही महिला धनाढ्य व्यक्‍तींसमोर स्वतःच्या आर्थिक अडचणीचा पाढा वाचून त्यांची सहानुभूती मिळवत होती. यानंतर त्यांच्यासमवेत प्रमाचे चाळे करताना तिचा प्रियकर त्याचे चित्रीकरण करत असे. हे चित्रीकरण कुटुंबाला दाखवण्याची धमकी देऊन खंडणी उकळली जात होती. या प्रकारे एका व्यक्‍तीकडून साडेसात लाख खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी कॉल गर्ल व विल्सन बाबु याकन्ना (25, रा.भीमनगर, मुंढवा) यांना अटक केली आहे.

फिर्यादी हे व्यवसायाने कर सल्लागार असून त्यांना त्यांच्या ओळखीच्या मित्राकडून एका कॉल गर्ल मुलीचा नंबर मिळाला होता. त्यांनी तिच्याशी संपर्क केला व बोलणे केले, त्यानंतर आरोपी महिला व फिर्यादी यांचे हॉटस्‌ऍपच्या माध्यामातून संभाषण होवून लागले. संबंधित आरोपी महिलेने ती कॉलगर्ल नसल्याचे सांगून व ती एका चांगल्या घरातील असल्याचे सांगितले. फिर्यादी व आरोपी महिला यांची भेट स्वारगेट चौकात झाली तेंव्हा त्यांनी आपण कोण आहोत, याबद्दल माहिती दिली. त्याआधारे संबंधित आरोपी महिलेस फिर्यादी हे धनाढ्य असल्याचे लक्षात आल्यावर तीने त्यांची सहानुभूती मिळवण्याकरीता घरगुती अडचणी सांगितल्या.

यानंतर तीने “खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे, तुम्ही मला यातून बाहेर काढा, मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही मला मदत करा’, असे सांगितले. त्यानंतर दोघांच्यात व्हॉटस्‌ऍप चॅटींग वाढत गेले. त्यामध्ये आरोपी महिला तिला पैशांची गरज असल्याचे सांगून पैशांची मागणी करत होती. तिने तिची वाई येथील 40 गुंठे जागेची प्रॉपर्टी आहे. ती तुम्हास गहाण ठेवते वगैरे सांगितले. यानंतर दोघे जण मिळून आरोपी महिलेच्या गावी वाई येथे गेले व तेथील प्रॉपर्टी बघितली. दोघांमध्ये विश्‍वास निर्माण झाला व त्यातून फिर्यादी यांनी सुरवातीस 1 लाख 20 हजार रुपये तिच्या अकाऊंटवर टाकले.

तीने “तुमचे पैसे मी माझी वाई येथील 40 गुंठे जागा विकून परत देईल’ असे आश्‍वासन दिले. त्यानंतर वेळोवेळी आरोपी महिलेने फिर्यादी यांना अडचणी सांगून पैसे मागितले. फिर्यादी यांनी ते तिला दिले. काही दिवसांनी, फिर्यादी हे दिलेल्या पैशांची परत मागणी करू लागले. तेव्हा तिने फिर्यादी यांची भेट घेऊन, तुम्हास जी सुरुवातीस माहिती मिळाली होती, ती बरोबर असून मी तुमच्याबरोबर लोणावळा येथे येते, पण दोघे तिकडे जावू, असे सांगितले. तेव्हा फिर्यादी व संबंधित महिला तेथे गेले, तेंव्हा आरोपी महिलेने तिचा प्रियकर यास तेथे व्हॉटस्‌ऍप लोकेशन शेअर करून बोलावून घेतले. फिर्यादी यांचे अंडरवेअर व बनियनवर आरोपी महिलेसोबत फोटो काढले, तसेच दोघांनी मिळून फिर्यादी त्यांना बळजबरीने दारू पाजून त्यांना गाण्यावर नाच करण्यास भाग पाडले. यासर्वांचे व्हिडीओ शूटींग काढले. त्यानंतर नॉयलॉनच्या दोरीने फिर्यादी यांचे हातपाय बांधले व हातात चाकू घेऊन जिवे मारण्याची धमकी देऊन 7 लाख 50 हजार रुपये दे नाहीतर तुझ्या कुटुंबाला मी हे फोटो व क्‍लिप पाठवितो, असे धमकावले. त्यांना त्यांचे मोबाइलवरून आरोपीत महिलेच्या अकाऊंवर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दबाव आणला. त्यावेळी फिर्यादी यांनी जाणीवपूर्वक चुकीचा पासवर्ड टाकून अकाऊंट ब्लॉक केले. त्यामुळे मोबाइलवरून पैसे ट्रांसफर झाले नाहीत. यामुळे आरोपी महिला व तिच्या प्रियकराने हॉटेलचे कॉम्प्युटरवरून आरोपी महिलेच्या अकाऊंटवर पैसे ट्राफर करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, फिर्यादीचे अकाऊंट ब्लॉक असल्याने पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी लोणावळा येथून निघून तिघेजण फिर्यादी यांच्या शुक्रवार पेठ येथील अीॉफसमध्ये आले व तेथून ते 60 हजार रुपयांचा आयडीबीआय बॅंकेचा बेअरर चेक घेऊन निघून गेले. त्यानंतर 6 लाख 90 हजाराचा धनादेश आरोपी महिलेच्या नावाने घेतला. त्यापैकी 60 हजार रुपये रक्‍कम त्यांनी काढून घेतली. 6 लाख 90 रुपयांचा धनादेश फिर्यादी यांनी पेमेन्ट स्टॉप केल्यामुळे तो वटला नाही. यामुळे 17 जून रोजी दोन्ही आरोपींनी फिर्यादींच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली, तसेच त्यांना मारहाण करून मोबाइलही फोडला. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्‍त अशोक, उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, राजकुमार केंद्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, मेहबुब मोकाशी, दत्तात्रय गरुड, राहुल घाडगे, मच्छिंद्र वाळके, गजानन एकबोटे, संदीप राठोड, अतुल साठे, सुजीत पवार व आरती कांबळे यांच्या पथकाने केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)