धनगर समाजाचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

फलटण ः शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकत्र आलेले धनगर समाजाचे बांधव.

फलटण, दि. 31 (प्रतिनिधी) – धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी फलटण तालुक्‍यातील धनगर बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी “धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे, उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जय मल्हार जय अहिल्या, आता नाही तर कधीच नाही’ अशा सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन केले. पुढील काही दिवसात विविध प्रकारचे आंदोलन करून सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न धनगर समाजाच्यावतीने करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विविध पक्षांच्या व संघटनेच्या तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी सामील होत धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती रेश्‍माताई भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, फलटण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मिलिंद नेवसे, शेतकरी संघटनेचे नितीन यादव यांनी धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी फलटण तालुक्‍यातील धनगर बांधवांनी सुरू केलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मागणी मान्य होत नसल्याने धनगर समाजाने हे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने या आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळालेच पाहिजे. धनगर समाज प्रत्येक लढ्यात अग्रेसर असतो. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्यास राज्य शासनाला भाग पाडू. भारतीय घटनेने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नाही. धनगर समाज्यावर राज्य सरकारने अन्याय केला आहे. या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षे मोर्चे, आंदोलने करत आहोत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा विषय मांडला असता काही मंत्र्यांनी विनाकारण विरोध केल्याने आमच्या आरक्षणाला विलंब होत आहे. या मंत्र्यांचा विरोध अर्थहीन असून त्यांच्या विरोधाला न जुमानता धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहोत. धनगर समाज आरक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी गरज पडल्यास कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायला तयार आहे असे यावेळी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)