धनगर समाजाचा तहसीलवर मोर्चा

पाथर्डी – धनगर समाजाला अनुसूूचित जमातीचे आरक्षण मिळावे, शेळी मेंढी विकास महामंडळाला तीन हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी आज धनगर समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
मोर्चाची सुरवात खोलेश्‍वर मंदिरापासुन करण्यात आली. मोर्चामध्ये पारंपरिक वेषभूषा केलेले धनगर समाज बांधव सहभागी झाला होता.हातात पिवळे झेंडे घेऊन “येळकोट येळकोट जय मल्हार’ चा गजर करत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी “देणार कसे नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही’,”आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत आंदोलकांनी तहसीलचा परिसर दणाणून सोडला. या मोर्चाला भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अजय रक्‍ताटे, राष्ट्रवादीचे रामराव चव्हाण, टायगर फोर्स चे प्रा. किसन चव्हाण, मुस्लिम समाजाच्या वतीने हुमायून आतार यांनी पाठिंबा जाहीर केला तर मोर्चात नगरसेवक प्रसाद आव्हाड, डॉ. शरद हंडाळ, दादाभाऊ चितळकर, अशोक चोरमले, सुभाष हंडाळ, श्रीधर हंडाळ, नामदेव ठोंबरे, भाऊसाहेब उघडे, कल्पजित डोईफोडे, वसंत घुगरे, जगदीश सोलाट, सुनील नरोटे, अण्णासाहेब बाचकर, पोपट क्षीरसागर, रामभाऊ दातीर यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांनी धनगर व धनगड अशी शब्दरचना करून आम्हाला फसवण्याचा उद्योग केला जात असुन मागील निवडणुकीच्या वेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी केली मात्र ते आता ही घोषणा विसरले आहेत. धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या माजी मंत्री मधुकर पिचड हे आदिवासी नसुन त्यांची डी.एन.ए. चाचणी करा, धनगर समाजाच्या मतांवर भाजप, शिवसेनेचे सरकार आले असुन तातडीने त्यांनी आरक्षण द्यावे, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवुन देवू. आंदोलन करताना एकाही एस. टी. बसची काच फोडली नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र आमचा अंत पाहु नका. अन्यथा उद्रेक करूत असा इशारा वक्‍त्यांनी यावेळी दिला. या मोर्चाला प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील हे सामोरे गेले. आंदोलकांनी त्यांना मागण्याचे निवेदन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)