द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना नाकारा – दोनशे प्रख्यात लेखकांचे एकत्रित आवाहन

नवी दिल्ली – देशातील प्रख्यात दोनशे लेखक, विचारवंतांनी द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना नाकारा आणि विविधता आणि समतावादी भारतासाठी मतदान करा असे आवाहन केले आहे.लेखक, विचारवंतांनी खुल्या पत्राद्वारे हे आवाहन केले आहे.

या पत्रावर गिरीष कर्नाड, अरूंधती रॉय, अमितव घोष, नयनतारा सहगल, रोमीला थापर यांच्या सारख्यांच्या सह्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की सध्या देशात विघातक स्वरूपाचे राजकारण सुरू आहे. लोकांमध्ये भय निर्माण केले जात असून अधिकाधिक लोकांना पुर्ण नागरीक म्हणून जगण्याचा अधिकारही नाकारला जात आहे. सध्या लेखक, कलाकार, चित्रपट निर्माते, संगीतकार आणि सांस्कृतीक क्षेत्रातील अन्य व्यक्तींनी धमकावले जात आहे त्यांचा आवाज दाबून टाकला जात आहे त्याबद्दलही या पत्रात निषेधाचा सूर काढण्यात आला आहे.

सत्तेला प्रश्‍न विचारणाऱ्यांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवले जात आहे. त्यांची छळवणूक केली जात आहे. हे वातावरण बदलण्याची गरज आहे. त्यामुळेच सर्व नागरीकांनी आता विविधता आणि समानता जपणाऱ्यांच्याबाजूने मतदान करावे असे आवाहन यात करण्यात आले आहे. भारतीय घटनेने जे अभिवचन नागरीकांना दिले आहे ते जपणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

भारतीय राज्य घटनेने आपल्याला समान अधिकार दिले आहेत. त्यात हवे ते खाण्याचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विरोधी मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असे अधिकार देण्यात आले आहेत. पण गेल्या काही वर्षात याच कारणावरून जमावाकडून ठार मारले जाण्याच्या घटना देशात घडल्या आहेत. धर्म, जात, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश अशा स्वरूपाचा भेदभाव केला जात आहे.

लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्या थांबवल्या पाहिजेत, दलित, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्या विरोधातील हिंसाचाराबद्दल कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. सर्वांना समान अधिकार मिळून आर्थिक उन्नतीची समान संधी उपलब्ध व्हावी आणि आपल्या देशातील लोकशाही पुन्हा बहरावी अशी अपेक्षाही यात व्यक्त करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.