केडगाव- दौंड तालुक्यांतून वाहणाऱ्या मुळा-मुठा आणि भीमा नद्यांना पूर आला असला तरी तालुक्यातील शेतकरी आजही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. मागील काही दिवसांपासून खडकवासला आणि चासकमान धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता.
धरणे पूर्ण भरली आहेत, त्यामुळे धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान तालुक्यांतून वाहणाऱ्या मुळा-मुठा आणि भीमा नद्यांना पूर आला आहे. तो इतका मोठ्य प्रमाणात होता की प्रशासनाला भीमा नदीवरून शिरूरकडे जाणारा आणि राहु येथील पूल काही काळासाठी वाहतुकींसाठी बंद करावा लागला. सध्या स्थिती नियंत्रणात आली आहे, तरी पुराची तीव्रता अजूनही जाणवत आहे. असे असताना दौंड तालुक्यातील शेतकरी मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पुरेशा पावसाअभावी शेतीत असणारी कामे ठप्प आहेत.
ऊस लागवड पेरण्या सुरू नाहीत. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर ऊसलागवड आणि पेरण्या केल्या असल्या तरी झालेल्या पावसाने विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली नाही, त्यामुळे बारमाही शेती करण्यासाठी मोठ्य पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आजही कायम आहे.