दौंडची पाणी योजना अखेर मार्गी

राजकारणातून रेंगाळलेला प्रश्‍न; युती शासनाकडूनच दखल

दौंड- दौंड नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेला युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून 1995 मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश आले असले तरी दौंडची पाणी योजना आघाडी सरकारच्या काळात रखडली असल्याचे उघड आहे. याच कारणातून दौंडकर या निवडणुकीत राष्ट्रवादीला पुन्हा एकदा “पाणी पाजणार’ अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

दौंड शहराची पाणीपुरवठा योजना जुनी असून सध्याच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये बऱ्याचठिकाणी पीव्हीसी पाइपचा वापर आहे. त्यामुळे गळतीही मोठ्या प्रमाणात होते. यातून पाणीपुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण होत असताना तसेच ती पूर्णपणे बदलणे गरजेचे असल्याने शासनाच्या सुजल व निर्मल योजनेंतर्गत नगरपरिषदेने जल व ऊर्जा लेखापरीक्षण करून घेतले. त्यानुसार भविष्यातील 30 वर्षांची पाण्याची गरज विचारात घेऊन, महाराष्ट्र नगरोत्थान योजनेंतर्गत सुधारित पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठीही पाठविला होता. ही योजना पूर्ण झाल्यास शहरातील भीमनगर, इंदिरानगर, साठेनगर, सिद्धार्थनगर, तुकाईनगर, नवगिरेवस्ती यासह शहरातील इतर भागालाही पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. परंतु, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. या प्रश्‍नावरून नगरपरिषदेवर मोर्चे, आंदोलनेही झाली. त्यानंतरही आघाडी सरकारकडून दौंडच्या पाणी प्रश्‍न दुर्लक्षच केले गेले.

राज्यात 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. दौंड शहराची मूळ पाणी पुरवठा योजना 1975 मध्ये कार्यन्वित करण्यात आली असून याबाबत दुरूस्ती तसेच नव्या योजेनेचा फेरप्रस्ताव 1995 मध्ये सादर करण्यात आल्याचे शिवाय दूरगामी विचार करून 2045 सालापर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून गेली 44 वर्षे रखडलेली ही योजना त्वरित मंजूर होणे आवश्‍यक असल्याचे आमदार कुल यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दौंड शहराचे नागरिकीकरण वाढती लोकसंख्या यातून निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याकरीता दौंड नगरपरिषदेद्वारे नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करून याकरीता निधी मिळवला.

आमदारांच्या पाठपुराव्यातून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले असून खडकवासला कालव्यावरील तळ्यासह पाइपलाइनचे मोठे काम सुरू करण्यात आले आहे. याकरीताच्या पहिल्या टप्यातील निधीही नगरपालिकेकड वर्ग करण्यात आला आहे. या नव्या योजनेमुळे दौंडचा पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. परंतु, गेल्या 44 वर्षानंतर प्रश्‍न मार्गी लागत असल्याने राजकारणातूनच हा प्रश्‍न रेंगाळला गेल्याची मानसिकता दौंडकरांत निर्माण झाली आहे.

  • दौंड शहराकरीता पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. याकरीताचा संपूर्ण निधी उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सातत्याने आहे. यातून योजना पूर्ण होऊन शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.
    – राहुल कुल, आमदार, दौंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)