दोनशे फूट खोल दरीत अडकलेला “यश’ सुखरूप

  • विसापूर कड्यावर वाट भरकटला होता युवक
  • लोणावळा शिवदुर्ग रेस्क्‍यू टीम, पाटण ग्रामस्थांचा पुढाकाराने बचावकार्य

कार्ला – पाटण गावातून विसापूर किल्ल्यावर मित्रांबरोबर फिरायला गेलेला पुण्यातील यश कासाट हा 20 वर्षीय युवक कड्यावर अडकून बसला होता. सुमारे दीडशे-दोनशे फूट खोल दरीत अडकलेल्या युवकाला खाली किंवा वर जाता येत नव्हते. शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंधारामुळे युवक पूर्णपणे संकटात सापडला होता. परंतु लोणावळा शिवदुर्ग रेस्क्‍यू टीम व पाटण ग्रामस्थांचा मदतीने साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर युवकाला वाचविण्यात यश आले.

कड्यावर अडकलेला यश आपल्या सात मित्रांसह विसापूर किल्ला फिरण्यासाठी आला होता. किल्ल्यावर फिरत असताना तो परतीच्या मार्गावर होता. काही मित्रांच्या पुढे चालत असताना त्याची वाट भरकटली आणि एका अवजड कड्यावर यश अडकून पडला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विसापूर किल्ल्याच्या कड्यावर एक युवक अडकलेला आहे, अशी माहिती पाटण येथील काही तरुणांना समजली. त्याच्या मदतीसाठी पाटण येथील तरुणांची धावपळ सुरू झाली. काही लोक कड्यावरुन गेले, काही पायथ्याजवळ थांबून यशला आधार देत होते. संपूर्ण गाव, महिला, मुले रस्त्यावर येऊन त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते.

गावातील लोकांनी त्याला मदतीसाठी एक दोरखंड सोडला होता. त्याने तो स्वतःच्या कमरेभोवती बांधून घेतला. वर किंवा खाली जायचा प्रयत्न करत होता. पण दोन-तीन तास अडकून बसल्यामुळे त्याच्या शरिरात त्राण राहिला नव्हता. त्याची सर्व ताकद संपून गेली होती. हात-पाय थरथरत होते. एक थोडीशी चूक त्याच्या जीवावर बेतणार होती. त्यामुळे तोड खडकाला पकडून थांबला.

स्थानिक नागरिकांनी त्याला संयम ठेवायला सांगत होते. बचावासाठी शिवदुर्ग रेस्क्‍यू टीम येईल, असा मानसिक आधार देत होते. शिवदुर्ग टीमचे योगेश उंबरे, रोहित वर्तक यांनी हार्नेस घालून अन्य साहित्यासह तयार झाले, बाकी टीम रोप मोकळा करुन अँकरिंग करायला घेतली. दोरीच्या साह्याने योगेश खाली त्याच्याजवळ गेला. अडकलेल्या यशला हार्नेस घालून रोपमध्ये लॉक करून घेतले. त्याला सुखरुप खाली सोडले. तोपर्यंत रात्रीची नऊ वाजले होते. गावातील कार्यकर्ते, तरुण खाली होतेच त्यांनी त्याला गावापर्यंत घेऊन गेले. त्याच्या बरोबर आलेले त्याचे मित्र यांनी शिवदुर्गच्या टीमचे व गावकऱ्यांना आभार मानले.

शिवदुर्गच्या या टीममध्ये योगेश उंबरे, रोहित वर्तक, वैष्णवी भांगरे, अनिल सुतार, आनंद गावडे, सागर कुंभार, सिद्धेश तिकोणे, मयूर तिकोणे, ओंकार कोंडभर, मुकूंद तिकोणे, नितीन तिकोणे, सुनील गायकवाड, युवराज तिकोणे, रवींद्र तिकोणे, संभाजी तिकोणे, तुकाराम तिकोणे, विठ्ठल तिकोणे यांनी सहभाग घेतला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here