दोघांत नको तिसरा, मतभेद सारे विसरा

युती झाल्याने इच्छुकांची पंचाईत ः विद्यमान आमदारही अडचणीत

मंगेश पाटे

खोडद-2014च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत “घटस्फोट’ घेतल्याचे सांगत आमची 25 वर्षे (सन 1989 ते 2014) युतीत सडली! आणि युती तुटल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता सारं विसरायचं. युती फक्त दोघांमध्येच यात तिसरा कोणी नको. याशिवाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व कोकणातील नेते व माजी मंत्री नारायण राणे यांनाही भाजपने रेड सिग्नल दाखवत ताकद ओळखून शिवसेनेनशीच घरोबा करण्याचे निश्‍चित केले.
युतीच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युलानंतर येत्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे मतदार संघ बदलण्याची शक्‍यता धुसर झाली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या नव्या रचनेनुसार 21 जागा आहेत. यामध्ये पुणे शहरातील 8 आणि पुणे जिल्ह्यातील 13 जागांवर विद्यमान आमदार व त्यानंतर दुसऱ्या क्रमाकांची मते मिळालेला उमेदवार यांचा विचार करूनच भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी सहा जागा मिळण्याची शक्‍यता आहे.
जुन्नर तालुक्‍यात गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेले आणि भाजपाकडून लढलेले नेताजी डोके तटस्थ राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे, तर माजी तालुकाप्रमुख संभाजी तांबे, शरद चौधरी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, उपसरपंच संतोष दांगट, श्री मुक्ताई ग्रामीण पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सोपानराव शिंदे आदि कार्यकर्त्यांनी जुन्नरचा आमदार शिवसेनेचाच झाला पाहिजे असा विडा उचललेला आहे. तर जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे हे आपल्या कामाची पावती म्हणून आपलाच दावा सांगत आहे. विद्यमान आमदार आणि शिवसेना यांच्यात कॉंटे की टक्कर होणार असल्याचे दिसत आहे. जुन्नरचे विद्यमान आमदार यांनी विकासकामांचा दावा केला आहे. 2004 पासून तालुक्‍यातील जनतेची सेवा केली आहे. विवाहसमारंभ दशक्रिया, सार्वजनिक मंडळाचे कार्यक्रमात सतत सहभाग, विकासकामे आणि महत्वाचे म्हणजे सर्व पक्षीय कार्यकर्ते व नेत्यांसोबत संपर्क असल्याने जुन्नरवर आपलाच दावा असल्याचे दादांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे भविष्यात विद्यमान आमदार आणि शिवसेना यांच्यात कॉंटे की टक्कर पाहायला मिळणार हे निश्‍चित.

 • या मतदारसंघांवर शिवसेनचा दावा
  विद्यमान आमदार आणि दुसऱ्या क्रमांकाची मते या सूत्रांनुसार खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे आणि पुरंदरमध्ये विजय शिवतारे आमदार आहेत. तर मावळ विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार बाळा भेगडे, शिरूर मतदार संघात बाबुराव पाचर्णे हे विद्यमान आमदार आहेत. या चारही जागा संबंधित पक्षाकडे राहण्याची शक्‍यता आहे. जुन्नरमध्ये मनसेचे विद्यमान आमदार शरद सोनवणे, आंबेगावमधून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व भोरमधून संग्राम थोपटे हे विद्यमान आमदार आहेत. या तीनही विधानसभा मतदार संघात 2014च्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर जागा लढून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे खेड व पुरंदरसह या तीन अशा एकूण पाच आणि भोसरी किंवा पिंपरीच्या एका अशा सहा जागांवर शिवसेना दावा सांगण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 • या मतदारसंघात भाजपची ताकद
  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पारंपरिक बारामती विधानसभा मतदार संघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तर इंदापूरमधून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत. बारामती भाजपाच्या उमेदवारला दुसऱ्या क्रमांकाची मते होती. तर इंदापूरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला जास्त मते होती. त्यामुळे बारामती, इंदापूर, मावळ, शिरूर, चिंचवड व पिंपरी किंवा भोसरी येथील सहा जागांवर भाजपा तर जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी शिरूर, मावळ व भोसरी या सहा जागांवर शिवसेना दावा सांगण्याची शक्‍यता आहे. तर दौंडची जागा भाजपाचे सहयोगी पक्षाचे (राष्ट्रीय समाज पक्षाचे) राहुल कुल आमदार असल्याने ही एकमेव जागा त्यांनाच राहू शकते.
 • शहरात 3-5 की 4-4?
  पुणे जिल्ह्याचा विचार करता युतीमुळे शिवसेना आणि भाजपातील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली असून वरिष्ठांच्या निर्णयामुळे त्यांच्यावर गॅसवरच राहण्याची वेळ आली आहे; पण शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी शिवसेनेने भाजपाकडे तीन जागांची मागणी केली आहे. 2014च्या मोदी लाटेत आठही जागा भाजपाने स्वबळावर खेचून आणल्या. विधानसभेच्या फिफ्टी-फिफ्टी जागा लढविण्याच्या अटीवर विधानसभेसाठी युती झाल्याचे मुंबईत जाहीर करण्यात आले. त्यामुळे शहरातील जागा भाजपच्या ताब्यात असल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना काही जागांची मागणी भाजपांकडून करू शकते. 2014चा अपवाद वगळता 25 वर्षांच्या काळात भाजपाने आणि शिवसेनेने शहरात फिफ्टी फिफ्टीचाच फॉर्म्युला वापरला होता. 2004च्या विधानसभा निवडणुकीत शहरात सहा विधानसभा मतदार संघ होते. तेव्हाही भाजप-सेनेने निम्या-निम्या जागा लढविल्या होत्या. कसबा, पर्वती, बोपोडी भारतीय जनता पक्षाने तर भवानी, कॅटोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदार संघातून शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते.
 • शहरात असे असू शकते जागावाटप
  2009मध्ये विधानसभा निवडणुकीच्या नव्या रचनेत शहरात आठ मतदारसंघ तयार झाले. कसबा, पर्वती, बोपोडी, हडपसर, कोथरूड, शिवाजी नगर, वडगाव शेरी, खडकवासला या आठ पैकी त्यावेळीही सेना-भाजपाने निम्म्या निम्या जागा लढविल्या होत्या. पण 2014च्या मोदी लाटेत भाजपने आठही जागांवर जोरदार मुसुंडी मारून अक्षरश: कब्जा केला. आता वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड व हडपसर या चार जागांची मागणी शिवसेना करू शकते. कोथरूड, शिवाजीनगर हे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. कोथरूडमध्ये माजी मंत्री शशीकांत सुतार तर शिवाजीनगरमध्ये माजी आमदार विनायक निम्हण याचप्रमाणे वडगाव शेरीतून कामगार नेते रघुनाथ कुचिक हे दावा करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.