देहू-तळवडे रस्ता महापालिकेकडे हस्तांतरण करा

पिंपरी – देहुगाव मुख्य कमान ते तळवडे हा मार्ग गेली अनेक वर्ष केवळ भूसंपादना अभावी लालफितीत अडकून आहे. महापालिकेकडे रस्त्याचे केवळ सात मीटरचे क्षेत्र आहे. त्याच्या देखभालीसाठी महापालिका वर्षाकाठी साठ लाख रुपये मोजते. या रस्त्याचे भूसंपादन सार्वजनिक बांधकाम विभागाने करुन ही जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, असे साकडे रस्ता बाधितांनी महापौर राहुल जाधव यांची भेट घेत घातले.

देहु-आळंदी रस्त्याचे भूसंपादन अद्याप रखडले आहे. बाधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यासाठी मोबदला मागितला आहे. मात्र, या रस्त्याची काही जागा महापालिकेकडे हस्तांरीत करण्यात आली आहे. काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. तर काहींचे अद्याप भूसंपादन झालेले नाही. यासंदर्भात सोमवारी (दि. 27) महापालिकेत रस्ता बाधित ग्रामस्थांनी महापौरांची भेट घेतली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, देहुगावच्या सरपंच उषा चव्हाण, पंचायत समितीच्या अध्यक्ष हेमलता काळोखे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मार्गावर देहुगावला उत्तर व दक्षिण बाजुने प्रत्येक शंभर फुटांचा बाह्यवळण मार्ग देण्यात आला आहे. उत्तर भागात गायरान तर दक्षिण भागात शेती आहे. शेतीच्या भागासाठी त्वरीत मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक आमदार बाळा भेगडे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व देहुगावचे सरपंच यांची लवकरच बैठक बोलवली जाईल, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

देहू तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांची गैरसौय टाळण्यासाठी महापालिका या रस्त्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र यातील केवळ साडे सात मीटर रुंदीचा रस्ता महापालिकेकडे आहे. परंतु, अद्याप भूसंपादन पुर्ण न झाल्याने महापालिका दरवर्षी 60 लाख रुपये रस्त्याच्या देखभालीसाठी खर्च करत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनाची कार्यवाही पुर्ण करावी. संबंधितांना मोबदला द्यावा. तसेच जागा महापालिकेला हस्तांतरीत करावी. त्यानंतर महापालिका नियमानुसार रस्ता बांधून देईल.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड.

देहुगावच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे. या रस्त्यासाठी जागा देण्यास बाधीत तयार आहेत. परंतु, काही बाधित नागरिकांच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची जागा जात आहे. त्यामुळे एकाच बाजूची जागा संपादीत करावी, अशी त्या नागरिकांची मागणी आहे. त्याबाबत योग्य तो तोडगा काढण्यात येईल. तसेच याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील बोलणे झाले आहे.
– हेमलता काळोखे, सभापती, हवेली पंचायत समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)