देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी

देहुरोड (वार्ताहर) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा जकात नाक्‍यासमोरील माळरानावर टाकून तो जाळला जात आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर व प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी निगडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे.

या संदर्भात कदम यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोर्डाच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा कचरा बोर्डाच्या जकात नाक्‍यासमोरील माळरानावर आणून टाकला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. विल्हेवाटीसाठी कचऱ्याला आग लावली जाते. आग लावल्याने जळणाऱ्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. हा धूर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील यमुनानगर आणि प्राधिकरण भागापर्यंत पोचत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून धुमसणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत असून, महापालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर आणि प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याला सर्वस्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड जबाबदार आहे. नागरिकांचे बरे-वाईट झाल्यास त्याला बोर्डचे अधिकारीच जबाबदार असतील. आपल्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केल्यास महापालिका हद्दीतील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे माळरानावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. अन्यथा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)