देशातील सर्वांत स्वच्छ जिल्हा सातारा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्‍टोबरला होणार गौरव
नवी दिल्ली – स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 (ग्रामीण) मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वांत स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे. यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेने शौचालय बांधून हागणदारीमुक्‍त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळवला होता.

देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक 100 गुणांचे सर्वेक्षण केले होते. सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेच्या निरीक्षणास 30 गुण, नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्‍तींची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास 35 गुण व स्वच्छताविषयक सद्यःस्थितीला 35 असे 100 गुणांकामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सर्वेक्षणात देशातील 698 जिल्ह्यातील 6980 खेडी सहभागी झाली होती. 34900 सावर्जनिक ठिकाणांचा ज्यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे 174,500 लोकांची मुलाखत आणि सुमारे 50 लाख लोकांचा अभिप्राय नोंदवण्यात आला होता.

हे पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे स्वीकारणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)