देखाव्यांतून कारागिरांना अच्छे दिन

सातारा,  (प्रतिनिधी)

गणेश उत्सवात इतर अनेक गोष्टीबरोबर एका गोष्टीला वेगळे महत्व असते ती म्हणजे देखावे. या काळातील देखावे हे लोकांच्या आकर्षणाचा विषय असतात, मग ते हालते असोत किंवा जिवंत.साताऱ्यात देखाव्यांना मोठी परंपरा आहे. यामध्ये सजीव व तांत्रिक देखाव्यासह प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती, आकर्षक मंडपही उभारले जातात. या सगळ्यामुळे जिवंत देखावे करणाऱ्या कलाकारांना, त्यांची वेषभुषा करणाऱ्या रंगकर्मींना अच्छे दिन येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही मंडळांचे तंत्रकुशल कार्यकर्तेच देखाव्यांची तयारी करतात. मात्र काही मंडळांकडून कारागिरांना काम दिले जाते. पोवई नका, बालगणेश फुटका तलाव, जिल्हा बॅंक, मारवाडी गणेश मंडळ या ठिकाणी देखाव्यांसाठी सेट उभारणीवर झालेल्या आर्थिक खर्चामुळे कारागिरांना चांगले मानधन मिळते. हुबेहूब प्रतिकृतींसह इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तू, स्थळे कारागिर साकारतात. सजीव देखाव्यांसाठी विविध सामाजिक विषयांवरील संहिता लेखन आणि ध्वनीमुद्रण या क्षेत्रात लाखो रूपयांची उलाढाल होत असते. शहरातील काही स्टुडियो पंधरा दिवसांपासूनच गजबजले आहेत. दहा ते पंधरा मिनिटांच्या देखाव्यासाठी संवादलेखनापासून ते ध्वनीमुद्रण अशी तयार सीडी करून देण्याचे काम साताऱ्यातील, कोल्हापूरातील जवळपास शंभर कलाकार काम करतात.

यामध्ये अभिनेते, लेखक, ध्वनीमुद्रक, वेषभुषाकार, देखाव्यांना लागणारे साहित्य (ड्रेपरी) विक्री करणारे यांची लगबग सुरू आहे. गणेश उत्सवात देखाव्यांना लोकांची पसंती असल्याने गणेश मंडळे त्याकडे जास्त लक्ष देताना पाहयला मिळत आहे. या दरम्यान देखावे अन त्यासाठी लागणारे साहित्य यासाठी गणेश मंडळे लाखो रूपयांची उलाढाल करतात. यंदा महाराष्ट्रात अनेक घटनांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. त्याच घटनांवर देखावे तयार करण्याकडे मंडळांचा भर असल्याचे काही रंगकर्मींनी सांगितले. त्यामुळे मराठा मोर्चा, आंबेनळी घाट दुर्घटना, केरळ पुर, सध्या एका टिव्ही वर गाजत असलेली छ. संभाजी मालिका, तुझ्यात जीव रंगला, लागीर झाल जी या मालिकांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांना एखाद्या सामाजिक, किंवा ऐतिहासिक विषयावर देखावा करायचा असतो. त्यासाठी संवाद, सादरीकरणाच्या टिप्स आणि ध्वनीमुद्रण यासाठी स्टुडिओची गरज लागते. गणेशोत्सवकाळात अशा प्रकारचे काम करणाऱ्या हौशी कलाकारांपासून ते व्यावसायिक कलाकारांपर्यंत सर्वांना मागणी असते. संवाद लेखन आणि त्यासाठी आवाज देणे अशा दोन टप्प्यात हा व्यवसाय गणेशोत्सव काळात अनेक छोट्या कलाकारांसाठी आर्थिक स्रोत ठरतो. यंदाही यामध्ये लाखो रूपयांची उलाढाल होण्याची शक्‍यता आहे. साताऱ्यात देखाव्यांसाठी लागणाऱ्या साहत्याची विक्री करणाऱ्या दुकांनाकडे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पावले वळू लागली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)