दूध व दुग्धजन्य पदार्थासह अंडी अत्यावश्‍यक सेवेत

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची माहिती

मुंबई – मदत व पुनर्वसन विभागाद्वारे “ब्रेक द चेन’ अभियानाअंतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा आदी बाबींचा अत्यावश्‍यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

सुनील केदार म्हणाले, अत्यावश्‍यक सेवांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी) आणि फुड शॉपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चिकन, कोंबड्या, मटन, अंडी, मासे दुकानांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी आवश्‍यक असणारे पशु व कुक्कुट खाद्य, चारा याचाही समावेश करण्यात आला आहे.

अत्यावश्‍यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयाच्या मान्सूनपूर्व उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठीच्या अभियान काळात हाती घ्यावयाच्या लसीकरण कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अत्यावश्‍यक सेवांमध्ये स्थानिक कार्यालयाच्या मार्फत जनसामान्यांना पुरविण्यात येणा-या सेवा समाविष्ट आहेत. यात पशुसंवर्धन विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचा समावेश होतो. तसेच सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश अत्यावश्‍यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये आवश्‍यक वस्तू व सेवांकरिता वाहतूक व पुरवठा शृंखला अबाधित ठेवण्यात आली आहे. 

यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे व जनावरांचा चारा व त्यांचेवर प्रक्रीया करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची वाहतूक करणे व त्यांच्या साठवणूकीसाठी गोदामे चालविणे या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.