दुसऱ्यांच्या कामावर गडाखांनी छाती बडवली

आमदार मुरकुटे यांची टीका; दिघी बंधाऱ्याचे जलपूजन

गोपाळपूर – मागील काळात तालुक्‍यामध्ये माजी आमदारांनी जलसंधारणाची कामे ही कशी केली, हे सर्वांना माहीत आहे. कामे झाली पाहिजेत, याबाबत माझे दुमत नाही; परंतु शनी भगवंताचा पैसा, बंधारे उकरले कारखान्याच्या डिझेलमधून आणि छाती बडून घेतली माजी आमदारांनी अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांचे नाव न घेता केला.
नेवासे तालुक्‍यातील सलाबतपूर येथे हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्‌घाटन व दिघी येथे मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण झालेल्या सिमेंट कॉंक्रीट बंधाऱ्याचे जलपूजन त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे होते. या वेळी दिघीचे सरपंच दत्तात्रय निकम, सलाबतपूरचे सरपंच एकनाथ नगरे, दिघी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब निकम, गजानन गवारे, अण्णासाहेब गवारे, भाऊराव नगरे, रवींद्र निकम, सलीम शेख आदी उपस्थित होते.
आ. मुरकुटे म्हणाले, “”राजकीय साडेसाती, प्रशासकीय अडचणीतून मार्ग काढत दिघी-सलाबतपूरच्या शेतकऱ्यांचा खूप दिवसांचा बंधाऱ्याचा वनवास संपविला. यापुढे कालव्याला पाणी आल्यानंतर निश्‍चित बंधारे भरून दिले जातील. शेतकऱ्यांनी जागा दिल्यास आणखी बंधारे बांधण्यात येतील. नेवासे तालुक्‍यात आतापर्यंत सहा कोटी रुपयांचा निधी खर्च करून तीस बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील काळात अजून पंचवीस ते तीस बंधारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्‍यातील अनेक छोटया-मोठया रस्त्यांची कामे सुरू आहेत. तालुक्‍यात भरभरून विकासकामे केल्याने व गोरगरीब जनतेचा आशिर्वाद माझ्यासोबत असल्याने मला उद्याची चिंता वाटत नाही.”
कल्याण मते, रवींद्र निकम, संभाजी निकम यांनी बंधारा व सलाबतपूर, दिघीमध्ये अनेक विकासकामे आ. मुरकुटे यांच्यामुळे पूर्ण झाल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. या वेळी मोठ्या प्रमाणात दिघी व सलाबतपूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)