दुष्काळी भागावर बरसला वरूणराजा

अणे – नेहमीच दुष्काळी असणाऱ्या येथील अणे पठार भागात 4 ते 5 दिवसांपासून वरूणराजा रोज हजेरी लावत आहे. पावसाची रिपरिप रोज होत असल्याने या भागातील जलसाठ्या मध्ये वाढ होत आहे.
जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील या पठारावरील पेमदरा, अणे, नळवणे या भागातील बंधाऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. नळवणे येथे असणाऱ्या पाझर तलावामध्ये 40 ते 45 टक्के पाणीसाठा या पावसाने आला आहे. या पाझर तलावातून संपूर्ण नळवणे गावला पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे चांगला दिलासा या भागातील नागरिकांना मिळाला आहे. तसेच पेरणी झालेल्या पिकांनाही हा पाऊस वरदान ठरत आहे. पेमदरा येथील असणाऱ्या चोळी मायनर धरणामध्ये आतापर्यंत 10 ते 15 टक्के पाणीसाठा झालेला आहे. या भागातील बंधारेही फुल झाले आहेत. वरुणराजाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चोळी मायनर धरण या वर्षी 100 टक्के भरावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दोन वर्षांपासून अणे पठारावर भयंकर दुष्काळ जाणवत होता. या पावसाने अणे, पेमदरा, आनंदवाडी, नळवणे, भोसलेवाडी, कारेवाडी, आनंदवाडी या भागातील शेतकऱ्यांना पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे.
आणखी पावसाची अपेक्षा
गेल्या दोन वर्षांपासून असे ओढे पाण्याने खळखळून वाहिले नव्हते. यावर्षी असाच चांगला पाऊस झाला तर दुष्काळाचे सावट कमी होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पठार भागावर भीषण दुष्काळाचा वास्तव्य होते. या दुष्काळात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत; परंतु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या शेतकऱ्याच्या सुटण्यासाठी आणखी पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.