दुष्काळी तालुक्‍यांत धान्य गोडावून उभारणार- सदाभाऊ खोत

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात कडधान्याचे मोठ्या उत्पादन


नेहमी साठवणुकीचा प्रश्‍न उद्‌भवत असल्याने निर्णय

पुणे- विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात कडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. मात्र, त्याची साठवणूक करण्याचा प्रश्‍न नेहमी उद्‌भवतो. त्यामुळे दुष्काळी तालुके असलेल्या भागांत गोडावून उभारण्यात येणार असून, लवकरच या कामाला गती देण्यात येणार, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. या गोडावूनमुळे शेतमालास चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असेही खोत यांनी सांगितले.

शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे पणन मंडळाच्या संचालकांच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, बाजार समिती संघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते पाटील यांच्यासह बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खोत म्हणाले, कडधान्याचे उत्पादन हे विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही दुष्काळी तालुक्‍यात घेतले जाते.

गेल्या काही वर्षांपासून कडधान्यांचे अधिक उत्पादन झाल्यामुळे कडधान्याच्या साठवणुकीचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. हा प्रश्‍न गोडावून उभारल्यामुळे सुटू शकतो. त्यामुळे गोडावून उभारणीसाठी राज्य शासनकडून राष्ट्रीय विकास योजनेंतर्गत 9 टक्के अनुदान, 16 टक्के पणन मंडळाचे अनुदान, 10 टक्के बाजार समितीचे स्वत:ची रक्कम आणि तर 65 टक्के कर्ज हे पणन मंडळ बाजार समित्यांना देणार आहे. यासाठी 3 टक्के व्याजदर असणार असून, हा प्रकल्प एक कोटी रुपयांपर्यंत राहणार आहे.

गोडावून उभारणीमुळे साठवणुकीचा प्रश्‍न सुटेल
यंदा तूर, सोयाबीन, हरभरा या कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मात्र, साठवणुकीसाठी गोडावूनची संख्या अपुरी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, साठवणुकीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने खरेदी मंदावली होती. राज्यात मोठ्या प्रमाणात गोडावून उभी राहिली तर शेतमाल तारण योजनेला गती देता येईल. बाजारपेठांमध्ये एकाचवेळी जास्त आवक झाल्यास भावामध्ये घसरण होते. त्यामुळे अतिरिक्त माल गोदामांमध्ये साठवूण ठेवला तर भाव पडणार नाहीत. परिणामी शेतमालास चांगले भाव मिळण्यास मदत होईल, तसेच कडधान्यांच्या निर्यात वाढीलाही चालना मिळेल, असेही खोत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)