दुष्काळी झाबुआतील परिवर्तन 

दत्तात्रय आंबुलकर 

पश्‍चिम मध्य प्रदेशातील झाबुआ या परंपरागत जिल्ह्यात गेली 20 वर्षे विविध स्तरांवर दुष्काळाच्या विरोधात सातत्याने करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणजे झाबुआ जिल्हा दुष्काळमुक्त झाला आहे. गेल्या 20 वर्षानंतरचे परिणाम म्हणजे आज झाबुआ जिल्ह्यातील सर्व 818 खेडंयांमध्ये गाव तळी बारमाही वापरासाठी उपयुक्त ठरली आहेत. एकूण 2400 भूजल परियोजनांची झालेली पूर्तता व 730 लघुसिंचन योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्याचाच हा पाणीदार परिणाम झाबुआ या वनवासीबहुल दुष्काळी जिल्ह्यात दिसून येत आहे. पूर्वी जमिनीखाली 7 मीटरवर असणारी पाण्याची पातळी आता 4 मीटरवर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झाबुआतील परवालिया या ग्रामपंचायतीतील विहिरींच्या पाण्याची पातळी गेल्या दोन वर्षात एक मीटरने वाढली आहे. परवालियाच्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या पाटाद्वारे फळ लागवड यशस्वी केली आहे. याशिवाय पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील 12 छोटेखानी तलावांमधील गाळ काढण्याचा उपक्रम गावकरी अमलात आणत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत.

परवालीयाचे सरपंच कुशल सिंघर यांच्या मते सन 1990 च्या सुमारास झाबुआ या जिल्ह्यातील वन म्हणजेच जंगल वा हरितक्षत्र जवळजवळ लुप्त झाले होते. वर्षातील सुमारे सहा महिने जिल्ह्यातील बहुतांश वनवासी रोजगार-चरितार्थासाठी शेजारच्या गुजरात राज्यात जाणे, ही बाब नित्याचीच झाली होती. आता मात्र स्थानिक स्तरावर पुरेसे पाणी मुबलक स्वरुपात मिळू लागल्याने झाबुआतील इतर गावांप्रमाणेच परवालिया आणि परिसरात सर्वच शेतकऱ्यांना बारमाही शेती अधिक उत्पादक स्वरुपात करता येते. त्यामुळे या शेतकऱ्यांना रोख पैसे व फायदा देणाऱ्या शेतीचा फायदा मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी-वनवासींचे कामकाजासाठी गुजरातला जाणे पण आता जवळ जवळ इतिहासजमा झाले आहे. बदलते प्रयत्न आणि त्यांच्या परिणामामुळे 2015-16 मध्ये मध्य प्रदेशच्या 51 जिल्ह्यांपैकी 42 जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. त्यामध्ये झाबुआचा पण समावेश होता.

मात्र, त्या दुष्काळी वर्षात पण झाबुआ जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असे जाणवले नाही. जुनवानियाच्या सरपंच अनिता परमेश यांच्या मते, त्यांचे गाव आणि परिसरात जलसंवर्धन व पाणसाठ्याच्या ज्या योजना त्यापूर्वी अमलात आणल्या होत्या त्याचाच परिणाम म्हणजे अख्या झाबुआ जिल्ह्यात बहुसंख्य गावांमध्ये पाणी सहजपणे उपलब्ध झाले व त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता खूपच कमी झाली. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि ग्रामीण जनतेला पण जल व्यवस्थापनाचे महत्त्व पुरतेपणी समजले.

झाबुआच्या या यशस्वी प्रयत्नांमध्ये जिल्ह्यात 1994 पासून यशस्वीपणे अमलात आणलेल्या ग्रामीण जल संवर्धन-शेतीविकास प्रकल्पांचे मोठेच योगदान राहिले आहे. त्यानंतर ग्रामीण क्षेत्रातील “मनरेगा’ योजनेची सांगड पण जलसंवर्धन सिंचन कामाशी यशस्वीपणे घालण्यात आल्याने सारेच चित्र आणखी बदलले “मनरेगा’ अंतर्गत झाबुआमध्ये 470 ग्रामीण तळी-पाणवठे बांधण्यात आले व या बांध-बंधाऱ्यांमुळे आपण झाबुआच्या जल संवर्धन- शेत सिंचनावर सकारात्मक परिणाम झाला असून, त्यातूनच झाबुआ जिल्हा दुष्काळमुक्त नव्हे तर जल संवर्धन-सिंचन क्षेत्रात सर्वार्थाने स्वावलंबी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)